-तर माझ्या संपत्तीवरील प्रतिबंध हटवा
By Admin | Updated: June 1, 2016 03:00 IST2016-06-01T03:00:00+5:302016-06-01T03:00:00+5:30
गुंतवणूकदारांना रक्कम परत हवी असेल तर त्यांनी माझ्या संपत्तीच्या विक्रीवरील प्रतिबंध हटविला जावा यासाठी न्यायालयात जावे,

-तर माझ्या संपत्तीवरील प्रतिबंध हटवा
सुब्रतो रॉय यांची स्पष्टोक्ती : कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ‘आभार यात्रा’, गुंतवणूकदारांची निराशा
सोपान पांढरीपांडे नागपूर
गुंतवणूकदारांना रक्कम परत हवी असेल तर त्यांनी माझ्या संपत्तीच्या विक्रीवरील प्रतिबंध हटविला जावा यासाठी न्यायालयात जावे, असे मी सुचवू इच्छित असल्याचे सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. जवळपास ३ कोटी गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी रुपये परत देण्यात असमर्थ ठरल्याच्या कारणावरून रॉय मार्च २०१४ पासून कारागृहात आहेत. सध्या ७ मेपासून चार आठवड्यासाठी पॅरोलवर बाहेर आले आहेत. कठीण समयी सोबत असलेल्या गुंतवणूकदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी देशभरात ‘आभार यात्रा’ काढली आहे. रॉय चार्टर्ड विमानाने नागपुरात आले असता लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने २४ हजार कोटी परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम उभारण्याची तुमची योजना काय?
रॉय : हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर काहीही बोलू इच्छित नाही.
प्रतिनिधी : पॅरोलमध्ये वाढ न झाल्यास तुम्ही जेलमध्ये परताल. अशा स्थितीत गुंतवणूकदारांचे भविष्य काय?
रॉय : गेल्या २६ महिन्यांपासून मी कारागृहात आहेत. देशभरातील माझ्या संपत्तीच्या विक्रीवर न्यायालयाने प्रतिबंध लावले आहेत. रक्कम परत करण्याची माझी इच्छा आहे. प्रतिबंध दूर झाल्यास मला संपत्ती विकता येईल. जर गुंतवणूकदारांना परतावा हवा असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन माझ्यावर असलेले प्रतिबंध हटवावे.
प्रतिनिधी : परतावा देण्याची तुमची जबाबदारी आहे. गुंतवणूकदारांनी न्यायालयात का जावे?
रॉय : तिढा सुटण्याचा हा एक मार्ग आहे. जर प्रतिबंध दूर झाल्यास सध्या बंद असलेले व्यावसायिक उपक्रम सुरू होतील.
प्रतिनिधी : जामिनासाठी न्यायालयाने तुम्हाला ५ हजार कोटी रोख आणि तेवढ्याच रकमेची बँक हमी भरण्यास सांगितले होते. पण तुम्ही भरू शकले नाहीत. त्याचे काय?
रॉय : तुमच्याशी बोलताना आनंद होत आहे. पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी हे केले नाही. कृपया मला क्षमा करा.
(यावेळी कारच्या सभोवताल असलेल्या बाऊन्सर्सनी चालकाला कार पुढे नेण्यास सांगितले आणि संवाद इथेच संपला.)
गुंतवणूकदारांना २५० कोटी परत मिळण्याची प्रतीक्षा
नागपूर : संवादानंतर रॉय रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आले. त्यावेळी गुंतवणूकदारांनी त्यांची भेट घेतली. जवळपास ११०० गुंतवणूकदारांनी सहारा समूहाच्या वर्धा रोड, जामठाजवळील सहारा सिटी होम्स प्रकल्पात २५० कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम अडीच वर्षांपासून बंद आहे. प्रतिनिधी मंडळाचे नेते विकास गोयल यांनाही रॉय यांनी न्यायालयात जाऊन संपत्ती विक्रीवर असलेले प्रतिबंध दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
मंगळवारी दुपारी वर्धा रोडवरील राणी कोठी येथे रॉय यांनी सहारा समूहातील जवळपास १५०० कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. समूहाची अंतर्गत बाब असल्याचे सांगून त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना बैठकीत येण्यास मनाई केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी बैठकीत रोष व्यक्त केला. रॉय सायंकाळी चार्टर्ड विमानाने मुंबईला रवाना झाल्याची माहिती सहारा समूहाच्या सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
कंगाल उद्योजकाचा लक्झरी थाट
जामिनासाठी रोख आणि बँक गॅरंटी देण्यास अपयशी ठरलेल्या कंगाल उद्योजकाचा नागपूर दौऱ्यात लक्झरी थाट होता. आभार यात्रेसाठी सहारा समूहाने रक्कम कशी गोळा केली, हा गंभीर प्रश्न आहे.
रॉय चार्टर्ड बोर्इंग-७३७ विमानाने ५० बाऊंसर्स आणि तेवढ्याच सहारा समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रायपूर येथून नागपुरात आले.
रॉय यांच्या स्वागतासाठी समूहातील ५०० पेक्षा जास्त कर्मचारी काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, काळा टाय या गणवेषात हजर होते. गुंतवणूकदारांचा रोष आणि रॉय यांची थेट भेट टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना गणवेषात येण्यास बाध्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.
कडेकोट सुरक्षा
प्रसिद्धीमाध्यमांना टाळण्यासाठी बाऊंसर्सनी रॉय यांच्या सभोवताल गराडा घातला होता.
सहारा समूहाने रॉय यांच्या सेवेत दोन बीएमडब्ल्यू-७ सिरीज आणि मर्सिडिज-एस क्लास ठेवल्या होत्या. नागपुरात त्यांनी पांढऱ्या बीएमडब्ल्यू कारचा उपयोग केला.
समूहाने रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सहाराच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना आत येऊ न देण्याच्या सूचना केल्या होत्या. हॉटेलचे लॉबी व्यवस्थापक राजीव यांनीही लोकमतच्या छायाचित्रकाराला हॉटेलमध्ये येण्यास मज्जाव केला.
हॉटेलच्या लॉबीमध्ये सहाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लॉबीमध्ये होणाऱ्या घडामोडींवर त्यांचे लक्ष होते.
कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेले रॉय कमजोर दिसले आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचा आवाज क्षीण होता.