अवैध होर्डिंग्ज तात्काळ काढा
By Admin | Updated: November 26, 2014 01:10 IST2014-11-26T01:10:07+5:302014-11-26T01:10:07+5:30
महापालिकेच्या हद्दीत लागलेले अवैध होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे तसेच होर्डिंग्ज लावणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.

अवैध होर्डिंग्ज तात्काळ काढा
मनपा आयुक्तांचे निर्देश : संबंधितांवर गुन्हे दाखल करा
नागपूर : महापालिकेच्या हद्दीत लागलेले अवैध होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे तसेच होर्डिंग्ज लावणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.
विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतरही उमेदवारांचे अवैध होर्डिंग बऱ्याच शहरात लागलेले आहेत. ते त्वरित हटविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कारवाई न केल्यास महापालिका बरखास्त करण्याची शिफारस शासनाकडे करण्याचा इशाराही दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा मान राखत आयुक्त वर्धने यांनी अवैध होर्डिंग्ज विरोधातील कारवाईला गती देण्याचे निर्देश दिले.
आयुक्त वर्धने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, अवैध होर्डिंग्ज विरोधात महापालिकेची मोहीम नियमित सुरू असते. नागपुरात निवडणुका आटोपताच विशेष मोहीम राबवून निवडणुकीत लागलेले सर्व अवैध होर्डिंग्ज हटविण्यात आले होते. या कारवाईचा अहवालही तयार करण्यात आला आहे. शहरात कुठेही अवैध होर्डिंग, बॅनर दिसले की ते त्वरित काढा, अशा सूचना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील देण्यात आल्या आहेत. सफाई कामगार दररोज शहराच्या विविध भागात साफसफाई करतात. त्यांना अवैध होर्डिंग लागलेले दिसले की ते त्वरित झोनला कळवितात व अधिकाऱ्यांची संमती घेऊन होर्डिंग, बॅनर काढून घेण्याची कारवाई करतात. (प्रतिनिधी)
खासगी इमारतींवरील
होर्डिंगची तपासणी
शहरात बऱ्याच खासगी इमारतींवरही होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या सर्व इमारत मालकांनी महापालिकेकडून त्यासाठी परवानगी घेतली आहे का याची तपासणी करावी व परवानगी घेतली नसेल तर इमारत मालकावर गुन्हे दाखल करावे,असे निर्देशही झोनच्या सहायक आयुक्तांना देण्यात आल्याचे वर्धने यांनी सांगितले.