‘बुलंद’ इंजिनची दुरावस्था
By Admin | Updated: April 17, 2016 03:08 IST2016-04-17T03:08:38+5:302016-04-17T03:08:38+5:30
पैसे खर्च करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने वाफेच्या शक्तीवर धावणाऱ्या ऐतिहासिक इंजिनची डागडुजी केली.

‘बुलंद’ इंजिनची दुरावस्था
देखभाल नाही : असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला
नागपूर : पैसे खर्च करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने वाफेच्या शक्तीवर धावणाऱ्या ऐतिहासिक इंजिनची डागडुजी केली. एका भव्य समारंभाचे आयोजन करून ‘बुलंद’नावाचे इंजिन मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या कार पार्किंग परिसरात स्थापनही केले. त्यानंतर मात्र रेल्वेच्या एकाही अधिकाऱ्याने या इंजिनकडे ढुंकून पाहिले नसल्यामुळे या इंजिनची दुरवस्था झाली आहे. या इंजिनवर धूळ, इंजिनखाली अस्वच्छता वाढून असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकाची शोभा वाढविणाऱ्या या इंजिनच्या देखभालीकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांच्या संकल्पनेतून वाफेच्या शक्तीवर धावणारे रेल्वे इंजिन बसविण्यात आले. त्यासाठी एका भव्य समारंभाचे आयोजन रेल्वेस्थानकावर करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या इंजिनची स्वच्छता, नियमित देखभाल करण्यात येत होती. परंतु कालांतराने रेल्वेस्थानकाच्या शोभेत भर घालणाऱ्या या इंजिनकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या त्याला अवकळा आली आहे. या इंजिनच्या सभोवताला स्टीलचे कठडे लावण्यात आले होते. परंतु या कठड्याच्या चेन चोरट्यांनी पळविल्या. काही दिवसांनी या इंजिनखालील जागेचा ताबा असामाजिक तत्त्वांनी घेतला. रेल्वेस्थानकावर भीक मागून पैसे गोळा झाले की शेजारच्या दुकानातून दारूची बाटली विकत घेऊन इंजिनखाली बसणाऱ्या असामाजिक तत्त्वांची संख्या वाढली आहे. या इंजिनखाली दारूच्या बाटल्या नेहमीच आढळतात. याशिवाय या इंजिनखालील जागा आता रेल्वेस्थानक परिसरातील भिकाऱ्यांचे हक्काचे झोपण्याचे ठिकाण झाली आहे.
हजारो रुपये खर्च करून हे इंजिन बसविण्यात आले. परंतु त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या ऐतिहासिक इंजिनला अवकळा आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या इंजिनच्या देखभालीकडे लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)