‘पेट’ उत्तीर्णांना दिलासा
By Admin | Updated: October 27, 2016 02:31 IST2016-10-27T02:31:46+5:302016-10-27T02:31:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदापासून ‘पेट’च्या नियमांत बदल केले आणि अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केलेल्यांना फटका बसला.

‘पेट’ उत्तीर्णांना दिलासा
नागपूर विद्यापीठ : जुन्या निर्देशांनुसार पात्र उमेदवार करूशकणार ‘पीएचडी’ नोंदणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदापासून ‘पेट’च्या नियमांत बदल केले आणि अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केलेल्यांना फटका बसला. या मुद्यावरून विद्यापीठ प्रशासनावर सातत्याने दबाव वाढत होता व अखेर जुन्या निर्देशांनुसार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. ज्या उमेदवारांनी अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केली असेल व जे अद्यापही कालमर्यादेच्या पात्रतेत बसत असतील, असे उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘सिनॉप्सिस’ सादर करू शकतात, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या ‘निर्देश क्र. २९/१२’अनुसार ‘पेट’ दिली. जुन्या निर्देशांनुसार उमेदवाराला निकालाच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत पीएच. डी. नोंदणीकरिता अर्ज सादर करता येऊ शकत होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी तयारीसाठी वेळ घेत नोंदणीसाठी मागील वर्षी ‘सिनॉप्सिस’ सादर केले नाहीत.
मात्र, विद्यापीठाने ९ जून २०१६ रोजी अधिसूचना जारी करून ‘पेट’ची नवीन पद्धती जाहीर केली. यानुसार उमेदवारांना ‘पेट-१’ व ‘पेट-२’ अशा २ परीक्षा उत्तीर्ण करायच्या होत्या. ही अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आल्यामुळे ‘निर्देश क्र. २९/१२’अनुसार ‘पेट’ उत्तीर्ण उमेदवारांनाही नवीन पद्धतीनुसार ‘पेट’ द्यावी लागणार होती. जुन्या निर्देशांनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मागील ‘पेट’चा निकाल वैध ठरणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.
याविरोधात पाच विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले होते. ‘पेट’विषयी ९ जून २०१६ रोजी जारी अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी दिला होता. यानंतर विद्यापीठावर सातत्याने दबाव वाढत होता.
मंगळवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. जर पाच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, तर इतर विद्यार्थ्यांनादेखील संधी दिली पाहिजे, असा या बैठकीत सूर होता. अखेर ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या निर्देशांनुसार ‘पेट’ उत्तीर्ण केली आहे व जे पाच वर्षांच्या कालमर्यादेत बसतात त्यांना नोंदणीची संधी देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)