विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलासा
By Admin | Updated: June 21, 2014 02:44 IST2014-06-21T02:44:05+5:302014-06-21T02:44:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या ..

विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलासा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या (मुख्य शाखा) प्राचार्या डॉ. विभा महाजनी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. यामुळे त्या संबंधित रिट याचिका प्रलंबित असताना प्राचार्यपदी कायम राहणार आहेत. दरम्यान, त्यांना वेतन व भत्तेही मिळणार आहेत.
महाजनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यामुळे नियमानुसार गेल्या २१ जानेवारी रोजी निवृत्त होणार होत्या. सेवेची २ वर्षे वाढवून देण्यासंदर्भातील त्यांचा दावा विद्यापीठाने फेटाळला होता. त्या १३ पैकी ७ निकष पूर्ण करीत नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे होते. विद्यापीठाने त्यांना २१ जानेवारी रोजी निवृत्तीची नोटीस पाठविली होती. याविरुद्ध महाजनी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने गेल्या २६ फेब्रुवारी रोजी नोटीसवर स्थगनादेश दिला होता. यामुळे महाजनी वेतनाशिवाय पदावर कायम होत्या. आता न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी रिट याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतल्यानंतर महाजनी यांना वेतन व भत्त्यांसह पदावर कायम राहण्याची परवानगी दिली आहे.(प्रतिनिधी)
मुख्यालयी जाण्यास माध्यमिक विभागाची टाळाटाळ
नागपूर : कामकाजाच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये मुख्यालयाच्या नवीन व जुन्या इमारतीत असावी, या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)शिवाजी जोंधळे यांनी गेल्या महिन्यात माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय जुन्या इमारतीत हलविण्याचे आदेश दिले आहे. परंतु या आदेशानुसार कार्यवाही न करता शिक्षण विभाग कार्यालय हलविण्याला टाळाटाळ करीत आहे.
जि.प.च्या जुन्या इमारतीतील कार्यालये नवीन इमारतीत हलविण्यात आल्याने जुन्या इमारतीचा पहिला व दुसरा माळा रिकामा झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांना सुविधा व्हावी यासाठी े माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचे आदेश जोंधळे यांनी दिले आहे. परंतु जुन्या इमारतीत प्रशस्त जागा असली तरी या इमारतीत कार्यालय आल्यास आपल्या मर्जीनुसार कारभार करता येणार नाही. संस्था चालकांशी मनमोकळी चर्चा करता येणार नाही, अशी शंका माध्यमिक विभागातील काही अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी नको ती कारणे पुढे केली आहे. जुन्या इमारतीत लिफ्ट नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या अपंगांची गैरसोय होईल. माध्यमिक विभागात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पार्किंगची असुविधा होईल, असा अफलातून शोध या विभागातील अधिकाऱ्यांनी लावला आहे. वास्तविक अपंगांचा एवढा कळवळा असेल तर विभागातील अधिकारी वा कर्मचारी कामानिमित्त येणाऱ्या अपंगांना भेटण्यासाठी तळमजल्यावर येऊ शकतात. जुन्या इमारतीत जागा अपुरी पडली तर नवीन इमारतीत पार्किगसाठी प्रशस्त जागा आहे. इच्छा नसल्याने माध्यमिक विभाग ही कारणे पुढे करीत असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागातच नव्हे तर इतर विभागातही कामानिमित्त अपंग व्यक्ती येतात. आजवर त्यांना याची अडचणी आली नाही. मग माध्यमिक विभागातील अधिकाऱ्यांनाच अपंगांची चिंता कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीईओंचे आदेश माध्यमिक विभाग टाळत असल्याने याचा इतर विभागावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संदर्भात जोंधळे काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)