- डॉक्टर म्हणतात, रुग्ण रेमडेसिविरविनाही बरे होत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वावटळीत दररोजचे संक्रमित व मृत्यूचे आकडे सर्वसामान्यांच्या मनात धास्ती निर्माण करत आहेत. या स्थितीत सर्वाधिक चर्चेत असलेले विषय म्हणजे, रेमडेसिविर, सीटी स्कॅन स्कोर आणि ऑक्सिजन पातळी. रेमडेसिविरला तर संजीवनीचीच उपमा दिली जात आहे. रेमडेसिविर मिळाले की रुग्णाचा जीव वाचला, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यात काही हॉस्पिटल्स आणि संधिसाधू साठेबाज हात धुवत आहेत आणि सामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक भरडले जात आहेत. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांनी रेमडेसिविर हे ‘लाईफ सेव्हिंग ड्रग’ अर्थात संजीवनी असल्याचे साफ नाकारले आहे. त्यामुळे, सर्वसामान्य रुग्णांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, हे स्पष्ट होते.
---------------
रुग्णांनी आग्रह करू नये
रुग्णांना उपचारांबाबत कोणतीच माहिती नसते. सोशल मीडियातून आलेल्या चर्चेतून ते डॉक्टरांना नेमके हेच औषध द्या, असा आग्रह धरतात. त्याचाच लाभ संधिसाधू घेत आहेत. मुळात रुग्णात लक्षणे कोणती, त्याचा सीटी स्कॅन स्कोर काय, रक्ताची स्थिती कशी, ऑक्सिजन पातळी काय, यावर कोणते औषध दिले जावे, हे डॉक्टरांना माहीत आहे. रेमडेसिविर हे इतर औषधांप्रमाणेच एक इंजेक्शन असून, रुग्णांना गरज असेल तरच दिले गेले पाहिजे. कोरोनामुळे होत असलेला न्यूमोनिया हा पाच दिवसात लंग्च डॅमेज करतो. त्यामुळे, प्रारंभिक लक्षणातच रेमडेसिविर देणे गरजेचे आहे. त्यामुळे, रुग्णांच्या स्थितीचे दडपण कमी होते. नंतर त्याचा उपयोग नसतो. रेमडेसिविरमुळे आपण वाचणार आहोत, हा भ्रम चुकीचा आहे.
- डॉ. संजय राऊत : प्रमुख - औषधी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
---------
रेमडेसिविर नाही म्हणजे उपचारच नाही, हा भ्रम
सगळे उपचार रेमडेसिविरवर येऊन थांबते, हा चुकीचा भ्रम पसरविण्यात आला आहे. अनेक रुग्ण त्याशिवायही बरे होत आहेत. आजकाल कोणीही रुग्ण एचआरसीटी स्कॅन अर्थात हाय रिझॉल्युशन सीटी स्कॅन स्कोर काढण्यावर भर देत आहे. मुळात हे डॉक्टरांनी सांगितले तरच करणे अपेक्षित आहे. सीटी स्कॅन स्कोर ० ते २५ असा धरला जातो. हा स्कोर १०च्यावर असेल तर रेमडेसिविर सुचविले जाते. त्यामुळे, रुग्णाची स्थिती सुधारते. मात्र, हा स्कोर १४-१५च्यावर गेला तर रुग्णांची स्थिती थोडी अवघड झालेली असते. या स्थितीत रेमडेसिविरचा कोणताच उपयोग नसतो. शिवाय, रक्ताची स्थिती, ऑक्सिजन लेव्हल आदींचाही विचार रेमडेसिविर देताना केला जातो. रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नव्हे, हे समजून घ्यावे.
- डॉ. यशवंत देशपांडे : माजी अध्यक्ष : इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र
---------
रुग्णांच्या अज्ञानामुळे आणि संधिसाधू साठेबाजांमुळे काळाबाजार
रुग्णांना संधिसाधू साठेबाज आधीच घेरतात आणि रुग्णांची स्थिती विचारून नातेवाइकांना रुग्ण रेमडेसिविरशिवाय वाचू शकणार नाही, अशी भीती दाखविण्यास सुरुवात करतात. यात खासगी शासकीय असो वा खासगी हॉस्पिटल्समधील स्टाफचाही समावेश असतो. डॉक्टरांनी रेमडेसिविरचे प्रिस्क्रिप्शन दिले की लागलीच नातेवाईक भटकंती सुरू करतात आणि साठेबाजांची चांदी होत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, अनेक रुग्णांनी बरे झाल्यावर डिस्चार्ज बिलिंगच्या वेळी मला रेमडेसिविर दिलेच कधी, असा सवाल उपस्थित करून वादावादी करत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे, नातेवाइकांनी आणलेले रुग्णांसाठीचे रेमडेसिविर त्यांना न मिळताच परस्पर काळ्याबाजारात सादर होत असल्याचे दिसून येत आहे.
.................