ग्रीक, इजिप्तच्या व्यापाऱ्यांच्या खेळाचे अवशेष सापडले नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:00 IST2020-12-02T04:00:01+5:302020-12-02T04:00:01+5:30
नागपूर : जिल्ह्यातील कुहीजवळ भिवकुंड येथील गुफामध्ये अतिप्राचीन काळात खेळल्या जाणाऱ्या अनोख्या खेळाचा शोध लागला आहे. याला ‘फोनेशियन’ किंवा ...

ग्रीक, इजिप्तच्या व्यापाऱ्यांच्या खेळाचे अवशेष सापडले नागपुरात
नागपूर : जिल्ह्यातील कुहीजवळ भिवकुंड येथील गुफामध्ये अतिप्राचीन काळात खेळल्या जाणाऱ्या अनोख्या खेळाचा शोध लागला आहे. याला ‘फोनेशियन’ किंवा ‘मनकला’ म्हणून ओळखले जाते. इ.स. पूर्व ६ ते ३ ऱ्या शतकात हा खेळ इजिप्त, ग्रीक, आफ्रिका आदी देशात लोकप्रिय असल्याचे अवशेष सापडतात. हे २६०० वर्षापूर्वीचे अवशेष असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शोध अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आकाश गेडाम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाचे प्रा. डॉ. प्रियदर्शनी खोब्रागडे यांच्यासह विद्यार्थी अमर बरसागडे, प्रमोद चव्हाण यांनी कुहीवरून ११ किमीवर असलेल्या भिवकुंड येथे या खेळाच्या अवशेषाचा शोध घेतला आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये सोसायटी ऑफ साऊथ एशियन आर्किओलॉजी पुणे, श्रीलंका नॅशनल कमिशन फॉर युनेस्को, श्री जयवर्धनेपुरा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये यावर डॉ. गेडाम यांनी शोधपत्र सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविली आहे.
गुफेतील अवशेष व खेळ
भिवकुंडच्या गुफा क्र. २ मध्ये २ ते ३ व्यासाचे व तेवढ्याच खोलीचे काही खोलगट खड्डे आढळले. ते प्रमाणबद्ध पद्धतीने उकरले असल्याचे लक्षात येते. हा तोच प्राचीन खेळ असल्याचे समजते. यामध्ये दोन खेळाडू खेळत असून, खेळणी म्हणून शंख-शिंपले, कवळ्या, बिया व लहान दगडाचा वापर होत असेल. जो अधिक खेळणी जिंकेल तो विजेता ठरत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
अवशेषांचे संदर्भ कुठे? कुठे?
इ.स. पूर्व ६ ते ३ ऱ्या शतकात फोनशियन जमातीचे व्यापारी हा खेळ खेळत असल्याची माहिती आहे. तसेच खेळाचे अंकन इजिप्तमधील पिरॅमिड, कारनाक मंदिरातही आढळते. पूर्व आफ्रिका व उत्तर अमेरिकेत या खेळाचे अवशेष सापडले आहेत. आफ्रिकेत ‘वारी’ व ‘ओव्हरे’ नावाने तो लोकप्रिय आहे. आपल्या देशात दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्यात ‘पोलिगुझी’ या नावाने हा खेळ खेळण्याचे संदर्भ आढळले असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले.
.................
भिवकुंडजवळ असलेल्या आडम येथे उत्खननात प्राचीन बौद्ध स्तूप, रोमन नाणी व ‘अस्सक जनपदस्य’ नावाचा शिक्का सापडला आहे. प्राचीन काळी इजिप्त व ग्रीकमधून आलेल्या व्यापाऱ्यांनी हा खेळ त्यांच्यासोबत आणला असावा. हा प्रदेश प्राचीन अस्सक जनपदात मोडत असल्याने, मनकला या खेळाला ‘अस्सकला’ असे वैदर्भीय नामकरण करणे योग्य वाटते.
- प्रा. डॉ. आकाश गेडाम, गणित व मानविकी विज्ञान