लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजारीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने याला आपल्या नियंत्रणात घेतले. यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन पुरेसे उपलब्ध असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. परंतु इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील परिस्थिती तर वेगळीच आहे. येथील रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्याने बाहेरून आणण्यास सांगितले जात आहे. बाहेर इंजेक्शन उपलब्ध नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास होत आहे.
रविवारी मेयोमध्ये दाखल काही रुग्णांच्या नातेवाईकांनी लोकमतला सांगितले की, मेयोमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन नाही. त्यामुळे त्यांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले आहे. परंतु दुपारपासून सायंकाळ झाली तरी इजेक्शन मिळालेले नाही. दुसरीकडे मेयोतील सूत्रानुसार कोविडच्या बहुतांश वॉर्डात रेमडेसिविर इंजेक्शन नाही. वॉर्ड नंबर ४४ मध्ये गेल्या तीन दिवसांपासून इजेक्शन नाही. सूत्रांच्या दाव्यानुसार केवळ आयसीयूमध्येच रेमडेसिविर इंजेक्शन भेटत आहे. उर्वरित सर्व वॉर्डात इंजेक्शनचा तुटवडा आहे. मेयोमध्ये ३३ ते ४४ पर्यंत कोविड वॉर्ड आहेत. याशिवाय ३१ नंबरचा पोस्ट कोविड आयसीयू आणि २५ नंबर वॉर्डातही इंजेक्शन मिळत नाही. यासंदर्भात मेयोच्या अधिष्ठात्यांना विचारले असता उत्तर मिळू शकले नाही.