नुकसानभरपाईचा तिढा कायम
By Admin | Updated: July 7, 2014 01:00 IST2014-07-07T01:00:44+5:302014-07-07T01:00:44+5:30
तालुक्यात गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शासनाने २२ हजार ६२४ शेतकऱ्यांना पात्र ठरवित १४ कोटी ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली.

नुकसानभरपाईचा तिढा कायम
अतिवृष्टीमुळे नुकसान : एक हजार शेतक ऱ्यांचे ५१ लाख २१ हजार रुपये बँकेत पडून
उमरेड : तालुक्यात गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शासनाने २२ हजार ६२४ शेतकऱ्यांना पात्र ठरवित १४ कोटी ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. यातील एक हजार शेतक ऱ्यांचे ५१ लाख २१ हजार रुपयांचे धनादेश बँकेत पडून आहे.
महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. त्या अनुषंगाने महसूल विभागाने या पात्र शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईची रक्कम धनादेशाच्या माध्यमातून वितरित केली. परंतु, शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांक व नावातील घोळ चव्हाट्यावर आल्याने संबंधित धनादेश वटण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बँकांनी सदर धनादेश तहसील कार्यालयात परत पाठविले. या संपूर्ण प्रकाराला स्थानिक तलाठी जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचे नाव व्यवस्थित न दिल्याने हा घोळ झाल्याचे महसूल विभागातील अधिकारी सांगतात.
काही शेतकऱ्यांचे धनादेश महसूल विभागाने नागपूर येथील विदर्भ कोकण बँक, गांधीबाग येथे पाठविले होते. संबधित शेतकऱ्यांचे या बँकेत खाते नसल्याने ते धनादेश परत पाठविण्यात आले.
अशाच प्रकारचा घोळ उमरेड शहरातील इतर बँकेत सुरू आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ज्या बँकेचा धनादेश तयार करण्यात आला, त्या बँकेत संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे खाते उघडावे, असा तगादा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लावला असल्याचे काहींनी सांगितले.
या संदर्भात महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचे नाव शाखा लिहिताना तलाठ्यांची गफलत झाल्याचे त्यांनी मान्य केले. संयुक्त खातेदार असल्यास ज्या शेतकऱ्याच्या नावे शेतीचा सातबारा आहे, त्यांच्याच नावे धनादेश देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. परिणामी, सातबारा हा मृत शेतकऱ्याच्या नावे असल्यास (नोंदीअभावी) त्याच्या वारसांना ही रक्कम मिळविण्यासाठी कागदी घोडे नाचवित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
सध्या पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यातच धनादेशाचे नवे संकट निर्माण झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)