Relief of the common people with the help of the Center: Chandrasekhar Bawankule | केंद्राच्या मदतीने सामान्यांना दिलासा : चंद्रशेखर बावनकुळे

केंद्राच्या मदतीने सामान्यांना दिलासा : चंद्रशेखर बावनकुळे

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गरजूंनाही लाभ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २१ दिवसाच्या बंद (लॉकडाऊन) दरम्यान केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० कोटींच्या विविध योजनांची घोषणा केली. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागपूर जिल्ह्यातील गरजूंना याचा लाभ होणार असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी, नर्सेस तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति व्यक्ती ५० लाख रुपयांचा विमा केंद्र शासन काढणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गरिबाला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो डाळ आगामी तीन महिने मोफत दिली जाणार आहे. याचा फायदा ८० कोटी जनतेला होईल. शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून २ हजार रुपये पुन्हा खात्यात जमा करण्यात येणार आहेत. हातमजुरी करणाऱ्यांना मनरेगांतर्गत मिळणारा रोजगाराचा दर हा १८२ रुपयांवरून २०२ रुपये करण्यात आला आहे. यामुळे मजुरांना आर्थिक दिलासा मिळेल.
तसेच गरीब नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना एक हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन केंद्र शासनाने हा वर्गही दुर्लक्षित होऊ दिला नाही. जनधन खातेधारक महिलांना ५०० रुपये प्रतिमहिना आगामी ३ महिनेपर्यंत देण्यात येणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी महिलांना नि:शुल्क गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.लघु उद्योगांना कोणतीही जमानत न घेता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज केंद्र शासन उपलब्ध करून देणार आहे. संघटित क्षेत्रातील कामगारांच्या भविष्य निधीची रक्कम केंद्र शासन भरणार आहे. तसेच बांधकाम मजुरांसाठी ३१ हजार कोटींची योजना यावेळी घोषित करण्यात आली. गरीब आणि शेतकरी उपेक्षित राहून त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही याची पूर्ण दखल केंद्र शासनाने घेतली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Relief of the common people with the help of the Center: Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.