कंपोस्ट डेपोच्या आरक्षणातून मुक्ती
By Admin | Updated: April 25, 2015 02:22 IST2015-04-25T02:22:03+5:302015-04-25T02:22:03+5:30
गेल्या ४५ वर्षांपासून कंपोस्ट डेपोच्या (कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प) आरक्षणाच्या विळख्यात असलेले दक्षिण नागपुरातील हजारो भूखंड आता मुक्त झाले आहेत.

कंपोस्ट डेपोच्या आरक्षणातून मुक्ती
नागपूर : गेल्या ४५ वर्षांपासून कंपोस्ट डेपोच्या (कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प) आरक्षणाच्या विळख्यात असलेले दक्षिण नागपुरातील हजारो भूखंड आता मुक्त झाले आहेत. शुक्रवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १२२ एकर जमिनीवर प्रस्तावित संबंधित आरक्षण रद्द केल्यामुळे सुमारे ३० ते ४० नागरिकांना याचा फायदा होईल. सद्यस्थितीत सुमारे १० हजार लोकांनी येथे घरे बांधली असून सुमारे २५ ते ३० हजार भूखंड रिकामे आहेत.
कंपोस्ट डेपोच्या आरक्षणाशिवाय या परिसरात ५०० मीटरचा बफर झोनही ठेवण्यात आला होता. त्यामुळे संबंधित भागातही कुठलेही बांधकाम करण्यास परवानगी मिळत नव्हती. घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यावरही मर्यादा होत्या. आता या सर्व कचाट्यातून नागरिकांची मुक्ती होणार आहे.
नासुप्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संबंधित आरक्षण रद्द करण्याचा विषय विश्वस्त डॉ. छोटू भोयर व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश शिंगारे यांनी मांडला. हजारो नागरिकांच्या हितासाठी संबंधित आरक्षण रद्द करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेवटी विश्वस्त मंडळात आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता संबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.