मॅट्रिक्सच्या संचालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By Admin | Updated: July 30, 2015 02:47 IST2015-07-30T02:47:11+5:302015-07-30T02:47:11+5:30

नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या

Rejecting the anticipatory bail of the director of the matrix | मॅट्रिक्सच्या संचालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मॅट्रिक्सच्या संचालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

टाऊनशिपचे आमिष : कोट्यवधींनी फसवणूक
नागपूर : नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीच्या आशा टॉवरस्थित मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेटच्या एका संचालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
विजय त्रिलोकचंद वर्मा रा. रघुकुल सहा उज्ज्वलनगर, असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात डॉ. सुचितकुमार दिवाण रामटेके, विजय वर्मा यांच्यासह १२ आरोपी आहेत. अमरावती येथील कैलास भीमराव पाटील (४८) यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी १८ जुलै २०१५ रोजी या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
आरोपींनी धंतोली येथे आपले कार्यालय उघडल्यानंतर विविध शहरात टाऊनशिप, डेव्हलपमेंट हाऊसिंग स्किम, व्यापारी संकूल आणि इतर रहिवासी बांधकाम उभारले जात असल्याबाबतच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या. ठिकठिकाणी प्रॉपर्टी शो आयोजित केले होते.
जाहिरातीनुसार कैलास पाटील आणि इतरांनी या कंपनीच्या वानाडोंगरी येथील १.२७ हेक्टर जागेवरील रॉयल टाऊनशिप स्कीममध्ये फ्लॅट, दुकान, रो हाऊस रोख रकमेचा भरणा करून बुक केले होते. सर्व व्यवहाराचे अ‍ॅग्रीमेंट करून १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करून जागेचा ताबा देण्याचे कंपनीकडून कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीने वानाडोंगरीची ही जमीन खरेदीच केली नव्हती. संबंधित जिल्हाधिकारी, नगररचना, नासुप्र आदी शासकीय कार्यालयांकडून परवानगीही घेतली नव्हती. ही बनवाबनवी लक्षात येताच लोकांनी आपले पैसे परत मागितले असता त्यांना पैसेही परत करण्यात आले नाही. त्यांची फसवणूक करण्यात आली. आजपर्यंत ७५ जणांनी तक्रारी केल्या असून तक्रारींचा ओघ वाढत आहे. लोकांनी ६५ हजार ते ९ लाखपर्यंतच्या रकमांचा या कंपनीत भरणा केला आहे. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, प्रशांत साखरे, लीलाधर शेंद्रे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सागर आशिरगडे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एन. गड्डिमे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Rejecting the anticipatory bail of the director of the matrix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.