सदस्यांनी नाकारले अन् मतदारांनी स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:09 IST2021-03-24T04:09:00+5:302021-03-24T04:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : धुरखेडा (ता. काटाेल) येथील सरपंच विठ्ठल उके यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव पारित ...

सदस्यांनी नाकारले अन् मतदारांनी स्वीकारले
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : धुरखेडा (ता. काटाेल) येथील सरपंच विठ्ठल उके यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव पारित केला होता. या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दि.२३) मतदान घेण्यात आले. यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७२, तर अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात ३६२ मते मिळाली. यामध्ये ९० मते घेत विठ्ठल उके हे पुन्हा सरपंचपदी विराजमान झाले.
कोंढाळीनजीकची धुरखेडा (बोरगाव) ही जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त आदर्श गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विठ्ठल उके हे थेट जनतेतून निवडून आले. दरम्यान, उके यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. सरपंचासह आठ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत २ फेब्रुवारी राेजी अविश्वास प्रस्तावावर मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने सहा मते पडली. एक सदस्य तटस्थ हाेता. यामुळे सरपंच विठ्ठल उके यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अविश्वास प्रस्तावावर नागरिकांनी मतदान केले. एकूण ८८८ मतदार असलेल्या धुरखेडा येथे ४५९ नागरिकांनी मतदान केले. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७२, तर विराेधात २६२ मते मिळाली, तर २५ मते अवैध ठरली. यात विठ्ठल उके ९० मतांनी पुन्हा सरपंचपदी विजयी झाले. काटाेल पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी पीठासीन अधिकारी, तर कृषी अधिकारी सचिन गाेरटे यांनी सहायक पीठासीन अधिकारी म्हणून काम सांभाळले.