महानिर्मितीतील कंत्राटदाराचे बिल नियमित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:56+5:302021-07-28T04:08:56+5:30
कोराडी : येथील वीज केंद्रात काम करणाऱ्या विविध विभागांतील कंत्राटदारांचे देय असलेले कामाचे बिल नियमित व वेळेवर द्या, अशी ...

महानिर्मितीतील कंत्राटदाराचे बिल नियमित द्या
कोराडी : येथील वीज केंद्रात काम करणाऱ्या विविध विभागांतील कंत्राटदारांचे देय असलेले कामाचे बिल नियमित व वेळेवर द्या, अशी मागणी एमएसईबी कंत्राटदार असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेश रंगारी यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता खंडारे यांना असोसिएशनच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
सर्वच विभागांतील कंत्राटदारांना एप्रिल २१ पासून पूर्ण देयके मिळालेली नाहीत. येथील जुन्या व नवीन वीजनिर्मिती केंद्रात एकूण चार ते पाच हजारांच्या दरम्यान कंत्राटी कामगार आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदारामार्फत दर महिन्याला विशिष्ट मुदतीत वेतन द्यावे लागते. त्याचप्रमाणे जीएसटी, ईएसआयसी व पीएफ यांचाही भरणा वेळेवरच करावा लागतो. त्यामुळे कंत्राटदाराला नियमित बिलाची राशी मिळणे आवश्यक आहे. कोरोनाकाळापासून तीन ते चार महिन्यांची बिले थकीत राहतात. कंत्राटदाराला दर महिन्याला करावा लागणारा खर्चाचा आर्थिक बोजा हा मोठा असतो. एका महिन्याच्या फरकाने देयके मिळाल्यास कंत्राटदाराचे आर्थिक चक्र सुरळीत सुरू राहते. परंतु दीड वर्षापासून कंत्राटदाराला देयके देताना महानिर्मितीकडून विलंब केला जात आहे. सर्वच कंत्राटदाराची त्याच्या बँकेत असलेली सीसी (कॅश क्रेडिट) मर्यादा संपली आहे. अनेक कंत्राटदारांनी चल-अचल संपत्तीही गहाण ठेवलेली आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या कंत्राटदारांना सावरण्यासाठी महानिर्मितीने थकीत असलेली देयके तत्काळ द्यावी तसेच पूर्वीप्रमाणेच नियमित देयके अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.