४० हजार फेरीवाल्यांची नोंदणी करणार
By Admin | Updated: July 6, 2014 00:44 IST2014-07-06T00:44:30+5:302014-07-06T00:44:30+5:30
केंद्र शासनाच्या नगरविकास व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने शहरातील फुटपाथवरील किरकोळ विक्रे त्यांसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत महापालिका शहरात १६ हॉकर्स झोनची

४० हजार फेरीवाल्यांची नोंदणी करणार
महापालिका : शहरात होणार १६ हॉकर्स झोन
नागपूर : केंद्र शासनाच्या नगरविकास व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने शहरातील फुटपाथवरील किरकोळ विक्रे त्यांसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत महापालिका शहरात १६ हॉकर्स झोनची निर्मिती करून, ४० हजार फेरीवाल्यांची नोंदणी करणार आहे. आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत याचा आढावा घेतला.
या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक राज्यस्तरीय तर मनपास्तरावर आयुक्तांच्या अध्यक्षतेत समित्या गठित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजय काकडे यांनी दिली. नागपूर शहरात १६ हॉकर्स झोन प्रस्तावित आहेत. हॉकर्स व नो हॉकर्स झोन ठरविणे, फेरीवाला धोरणासाठी निविदा मागविणे, नोंदणी व मासिक शुल्क निश्चित करणे, फेरीवाल्यांचे पुनर्वसन, सोयीसुविधा, बाजारातील ओट्यांचे फेरीवाल्यांना वाटप आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे यासाठी हॉकर्स जागेचे फोटो काढून कुटुंबातील व्यक्तीची नोंदणी करण्यात येणार आहे. जागा देताना जुन्या फेरीवाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने मासिक शुल्कातील ५० टक्के रक्कम राखीव ठेवली जाणार आहे. अपंग, विधवा व फेरीवाल्यांना ओटे वाटप करताना प्राधान्य देण्यात येईल. फेरीवाल्यांना नोंदणीसाठी १००० रुपये व मासिक ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती काकडे यांनी दिली. मनपा प्रशासनाने यापूर्वीही फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. परंतु काही अडचणींमुळे ते बंद करण्यात आले. परंतु आता यासंदर्भात ठोस उपाययोजना करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एम.एस. गावडे, बाजार विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, स्थावर अधिकारी डी.डी. जांभूळकर, विनोद तायवाडे, नासुप्रचे एस.पी. पासेबंध, बाजार अधीक्षक डी.एन. उमरेडकर, सदस्य कौस्तुक चटर्जी, हॉकर्स संघटनांचे बाबा हाडके, ईश्वर रॉय, दिलीप रंगारी, अ. रज्जाक कुरेशी, जी.एन. भेले, प्रशांत दोसरवार, दिनेश अंडरसहारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)