शेतकऱ्यांनाे ई-पीक नाेंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:40+5:302021-09-23T04:10:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेऱ्याची नाेंद शासन सूचनेनुसार ई-पीक ॲपच्या माध्यमातून करावी, असे ...

शेतकऱ्यांनाे ई-पीक नाेंदणी करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेऱ्याची नाेंद शासन सूचनेनुसार ई-पीक ॲपच्या माध्यमातून करावी, असे आवाहन सहायक निबंधक तथा रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रवींद्र एन. वसू यांनी केले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका खंड ४, महाराष्ट्र राज्यातील ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या नियम १९७१ अन्वये राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्रामपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता गाव नमुना सात हा अधिकार अभिलेख विषय असून, गाव नमुना १२ हा पिकांची नोंद ठेवण्यासंदर्भात आहे. क्षेत्रीय स्तरावर पीक पेरणी अहवाल संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा अहवाल संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे आदी उद्देशाने पीक पेरणीबाबतची माहिती भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारे गाव नमुना १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः या ॲपच्या माध्यमातून कारवाई करण्याचे आवाहन वसू यांनी केले आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास त्यांनी कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधून आपला पीक पेरा नोंदवावा व सातबारा अद्ययावत करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.