साहिल सय्यदचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगितीस नकार : हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:58 AM2020-08-14T00:58:04+5:302020-08-14T01:44:20+5:30

गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला.

Refusal to suspend action on demolition of Sahil Syed's bungalow | साहिल सय्यदचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगितीस नकार : हायकोर्टाचा दणका

साहिल सय्यदचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगितीस नकार : हायकोर्टाचा दणका

Next
ठळक मुद्दे ले-आऊटमधील अन्य अवैध बांधकामे पाडण्याचा आदेशही दिला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. तसेच, बाबा बगदादियानगरमधील इतर अनधिकृत बांधकामेही आठ आठवड्यात पाडण्याचा आणि त्याचा अहवाल सादर करण्याचा महानगरपालिकेला आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. साहिलने मशिदीसाठी आरक्षित भूखंडावर बंगला बांधला आहे. त्याने बंगला बांधताना प्रशासनाची परवानगी घेतली नाही. गुन्हे शाखेने २९ जुलै रोजी मनपाला पत्र लिहून हा बंगला पाडण्याची सूचना केली होती. त्यानुसार मनपाने १० ऑगस्ट रोजी सय्यदच्या नावाने नोटीस जारी करून बंगला पाडण्यासाठी २४ तासाची मुदत दिली होती. त्यावर साहिलच्या वतीने उत्तर सादर करण्यात आले, पण त्या उत्तराने मनपाचे समाधान झाले नाही. परिणामी, बुधवारपासून बंगला पाडण्याला सुरुवात करण्यात आली. संबंधित ले-आऊट अनधिकृत असून ले-आऊटमध्ये २८८ भूखंड आहेत. त्यावर साहिलसह इतर अनेकांनी अवैध बांधकाम केले आहे. त्यावरही आता बुलडोझर चालविला जाईल.
मनपाच्या कारवाईविरुद्ध साहिलचे वडील खुर्शीद अली मो. अली सय्यद यांनी याचिका दाखल केली आहे. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित ले-आऊट अनधिकृत असले तरी ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित होऊ शकते. वादग्रस्त भूखंडावर अवैध बांधकाम करण्यात आले नाही. आवश्यक जागा मोकळी सोडण्यात आली आहे. कारवाई करण्यापूर्वी सुनावणीची संधी देण्यात आली नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. बंगल्याचा मालक साहिलविरुद्ध विविध प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले असून तो सध्या कारागृहात आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार तर, मनपातर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Refusal to suspend action on demolition of Sahil Syed's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.