बिलाची अतिरिक्त रक्कम परत करा !
By Admin | Updated: July 13, 2014 01:02 IST2014-07-13T01:02:03+5:302014-07-13T01:02:03+5:30
शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांकडून वीज बिलाच्या नावाखाली वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम तत्काळ परत करा, असे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी महावितरण व स्पॅन्को नागपूर

बिलाची अतिरिक्त रक्कम परत करा !
आमदारांशी बैठक : राज्यमंत्री मुळक यांचे वीज अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर : शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांकडून वीज बिलाच्या नावाखाली वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम तत्काळ परत करा, असे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी महावितरण व स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सोबतच या ग्राहकांच्या श्रेणीत ३१ जुलै २०१४ पर्यंत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शनिवारी वीज वितरण संबंधीच्या विविध समस्यांवर ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महावितरणच्या काटोल रोडवरील विद्युत भवन मुख्यालयात ती बैठक पार पडली. बैठकीला आमदार दीनानाथ पडोळे, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे व आ. नागो गाणार यांच्यासह महावितरणचे संचालक (वित्त) दत्तात्रय व्हावळ उपस्थित होते. दरम्यान महावितरण व एसएनडीएल संबंधी वीज ग्राहकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महावितरणच्या नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी व एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा यांनी सादरीकरण केले.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आॅगस्ट २०१२ मध्ये शाळा-महाविद्यालयांसाठी नवीन वीज दरश्रेणी निश्चित केली होती. याचा शाळा व महाविद्यालयांसह रुग्णालयांनाही फायदा मिळणार होता. या नवीन श्रेणीनुसार वीजदर कमी करण्यात आले होते. यापूर्वी शाळा-महाविद्यालयांचा दोन श्रेणीत समावेश करून, त्यानुसार वीजदर लागू करण्यात येत होते. यात १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रति युनिट ६.०५ रुपये दराने वीज बिल आकारले जात होते. तसेच ३०१ ते ५०० युनिटसाठी ७.९२ रुपये, ५०० ते १००० युनिटसाठी ८.७८ रुपये व एक हजारपेक्षा अधिक युनिटवर ९.५० रुपये प्रति युनिट दराने वीज बिल आकारले जात होते. शासकीय व अनुदानित शाळांकडून याच दराने बिल वसूल केले जात होते. खाजगी शाळांकडून एलटी-२ च्या श्रेणीनुसार बिल आकारले जात होते.(प्रतिनिधी)
आमदार निधीतील कामांना प्राधान्य द्या !
बैठकीत मुळक यांनी दोन्ही विभागाची बाजू ऐकून, ग्राहकांकडील वीज मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना लेखी पूर्वसूचना देण्यात यावी, मीटर सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेतच बदली करावे, वीज ग्राहकांनी वीज बिलासंबंधीच्या तक्रारी एसएनडीएलच्या कामठी रोड, तुळशीबाग, टीव्ही टॉवर, वर्धमाननगर, तुकडोजी पुतळा चौक, सुतगिरणी बिनाकी, इतवारी, मेयो व एएफओ येथील ग्राहक सेवा केंद्राकडे सादर कराव्यात, यानंतरही तक्रारींचे समाधान झाले नाही तर नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, एखाद्या ग्राहकाने अवास्तव बिलाची तक्रार केल्यास एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी त्या बिलाची फेरतपासणी करून ग्राहकांना सुधारित बिल द्यावे, वीज चोरी प्रकरणी तयार करण्यात येणारी बिले महावितरणच्या प्रचलित आरएडीपीआरपी पोर्टल व्यवस्थेनुसार तयार करण्यात यावी, जेणेकरून वाढीव बिलांबाबत ग्राहकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, वितरण यंत्रणा अधिक सक्षम करून आधुनिकीकरणाची कामे जलद गतीने करण्यात यावी व आमदार निधीतून करावयाची भूमिगत वीज वाहिन्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. बैठकीला महावितरणच्या नागपूर शहर परिमंडलाचे मुख्य अभियंता मोहन झोडे, मुख्य अभियंता सतीश बापट, अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर, कार्यकारी अभियंता वाय. डी. मेश्राम, एस. बी. सवदी प्रामुख्याने उपस्थित होते.