गाणारांच्या उमेदवारीवर भाजपात चिंतन
By Admin | Updated: January 11, 2017 03:03 IST2017-01-11T03:03:44+5:302017-01-11T03:03:44+5:30
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विरोधकांशी दोन हात करण्याची वेळ असताना भाजपमध्ये उमेदवारीवरूनच वादळ उठले आहे.

गाणारांच्या उमेदवारीवर भाजपात चिंतन
-तर प्रचार करणार नाही : संघ परिवार, शिक्षक परिषद व व्हीएचपीचा विरोध
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विरोधकांशी दोन हात करण्याची वेळ असताना भाजपमध्ये उमेदवारीवरूनच वादळ उठले आहे. भाजप व शिक्षक परिषदेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे नागो गाणार यांचे नाव उमेदवारीसाठी समोर करण्यात आल्यामुळे संघ परिवार, शिक्षक परिषदेचा नागपूर विभाग तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून गाणारांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परिवारातील संघटनांच्या या भूमिकेमुळे भाजपची चिंता वाढली असून गाणारांची उमेदवारी बदलण्यावर चिंतन सुरू झाले आहे.
गाणार यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच परिवारातूनच विरोध होत आहे. आता हा विरोध टोकाला गेला आहे. आजवर पडद्यामागे व्यक्त केली जाणारी नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात आहे. स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असलेले शिक्षक मतदार उघडपणे फिरून गाणारांविरोधात प्रचार करीत असल्याचे चित्र आहे. गाणार यांच्या कार्यकाळात परिवारातील संस्थांनाच अधिक त्रास झाला, शिक्षक परिषदेला गाणार यांनी कुठलीही मदत केली नाही, असे उघड मत कार्यकर्ते मांडत आहेत. एवढे करूनही गाणार यांना भाजपने तिकीट दिले तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरशी संबंधित असलेली ही जागा भाजपला गमवावी लागेल, अशी टोकाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
उघड नाराजीमुळे भाजपमध्येही गाणारांच्या उमेदवारीवर चिंतन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एवढ्या विरोधानंतरही गाणार यांना उमेदवारी देण्यापेक्षा दुसरा चेहरा देण्याचा किंवा परिवारातील रिंगणात असलेल्या दुसऱ्या उमेदवारालाच अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्यास सांगावे, असा विचार पक्षात सुरू झाला आहे. नागपूरची जागा असल्यामुळे भाजपच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अशात ही जागा गमावून विरोधकांना बळ देण्यापेक्षा कुठलाही कठोर निर्णय भाजपतर्फे घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.(प्रतिनिधी)