मनातील भाव उतरले कॅनव्हासवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:50 IST2019-01-06T00:49:00+5:302019-01-06T00:50:31+5:30
प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका कलाकृतीची निर्मिती होते. आर्किटेक्ट मीनाक्षी पवार यांनी अशाच मनातील भावनांना कॅनव्हासवर साकारून आकर्षक आणि मनाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.

मनातील भाव उतरले कॅनव्हासवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका कलाकृतीची निर्मिती होते. आर्किटेक्ट मीनाक्षी पवार यांनी अशाच मनातील भावनांना कॅनव्हासवर साकारून आकर्षक आणि मनाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये मीनाक्षी पवार यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. शनिवारी त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कलावंत सुधीर तलमले यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांत बांगडे उपस्थित होते. मीनाक्षी या मूळच्या चंद्रपुरातील आहेत. त्यांनी आर्किटेक्टची पदवी मिळविली आहे. पण त्यांना पेंटिंगची आवड आहे. त्यांनी आपल्या कलेतून एक वेगळी स्टाईल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘युफोरिया’ या थीमवर त्यांनी साकारलेल्या चित्रकृतीमधून त्यांच्या मनातील आनंदाचे भाव वेगवेगळ्या कलाकृतीतून व्यक्त केले आहे. आपल्या भावना मांडताना त्यांनी सोनेरी रंगाचा प्रत्येक कलाकृतीत भरपूर वापर केला आहे. सोनेरी रंग हा आनंदाचा आभास व्यक्त करणारा रंग म्हणून प्रेषित करतो. त्यांनी व्यक्त केलेल्या आनंदछटा कलाकृतीतून व्यक्त केल्या आहेत. सोनेरी रंगाचा वापर केल्यामुळे प्रत्येक कलाकृतीत आकर्षकता दिसून येत आहे. काही कलाकृतीमध्ये सोनेरी रंगातून स्त्रीचे अस्तित्व दाखविले आहे. या जगात स्त्री श्रेष्ठ असल्याचे तिने आपल्या कलाकृतीतून सांगितले आहे. तसेच पुरुष आणि स्त्रीच्या भावनांना सोनेरी आणि रुपेरी रंगातून दर्शविल्या आहेत.
प्रदर्शनात मांडलेल्या २३ ही कलाकृती त्यांनी अॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीतून साकारल्या आहेत. या सर्व कलाकृती माझे मन, मनाला झालेला आनंद याला व्यक्त करणाऱ्या असल्याचे मीनाक्षी आपल्या चित्राबद्दल बोलताना सांगते.