मिहानमध्ये वीजदरात लवकरच कपात
By Admin | Updated: June 14, 2015 03:02 IST2015-06-14T03:02:01+5:302015-06-14T03:02:01+5:30
मिहानमधील उद्योजक विजेच्या दरवाढीने गेल्या तीन महिन्यांपासून हताश आहेत.

मिहानमध्ये वीजदरात लवकरच कपात
नागपूर : मिहानमधील उद्योजक विजेच्या दरवाढीने गेल्या तीन महिन्यांपासून हताश आहेत. वीजदरवाढीचा फटका उद्योगांना बसला असून पुढील आठवड्यात वीजदरात कपात होण्याची माहिती आहे.
तीन महिन्यांपासून वाढीव दरात वीज
मिहान प्रकल्पातील उद्योजकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारला पुन्हा एकदा अपयश आले आहे. अभिजित कंपनीसोबत करार केला त्यावेळी प्रति युनिट २.९८ रुपये वीज उद्योगांना मिळणार होती. पण करार संपुष्टात आल्यानंतर महावितरणकडून थेट ९ रुपये प्रति युनिट वीज मिळणार होती. पण उद्योजकांनी वीज घेण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतरच उद्योजकांना ४.३८ रुपये प्रति युनिट दराने वीज मिळू लागली. पण पॉवर एक्स्चेंजमधून वीज खरेदीचे कारण पुढे करून एमएडीसीने वीजदरात वाढ केली आणि प्रति युनिट १.०४ रुपये अतिरिक्त वीजदराचा उद्योजकांवर भार लादला. गेल्या तीन महिन्यांपासून उद्योजकांना प्रति युनिट ५.४२ रुपये दराने विजेचा पुरवठा होत आहे. आता दरकपातीची उद्योजकांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
वीजदर कमी होणार!
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) वीज वितरणाचा परवाना आहे. यानुसार वीजखरेदीचा करार करण्यासाठी मे महिन्यात निविदा काढल्या होत्या. चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. कमी दरातील निविदा मंजूर करण्यात आली असून बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. त्यावर निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. आयोगाने शिक्कामोर्तब केल्यानंतरच वीज खरेदी करून मिहानमधील उद्योजकांना देण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मिहानमधील उद्योजकांना मिळणाऱ्या ५.४२ रुपये दरापेक्षा निश्चितच कमी आणि परवडणारा दर राहील, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वीजदर कमी असावे
मिहानमधील उद्योगांच्या विकासासाठी विजेचे दर कमी असावे, अशी मागणी आहे. उद्योगासाठी जागेचा करार केला त्यावेळी प्रति युनिट २.९८ दराने वीज मिळणार होती. पण भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ४.३८ रुपये दराने मिळणाऱ्या विजेचे दर पुन्हा ५.४२ रुपयांवर गेले. अशा अनिश्चिततेमुळे उद्योजकांमध्ये संभ्रम आहे.
-मनोहर भोजवानी, अध्यक्ष,
मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन.
वीजदरात निश्चितच कपात होणार
एमएडीसीने विजेचा पुरवठा करण्यासाठी मे महिन्यात निविदा बोलविल्या होत्या. त्यापैकी कमी वीजदर असलेल्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. नमूद कंपनीतर्फे वीजपुरवठ्यानंतर पुढील आठवड्यापासून वीजदरात निश्चितच कपात होणार आहे.
-तानाजी सत्रे,
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी.