पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:35+5:302021-05-30T04:07:35+5:30
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा वाहनचालकांना त्रास होत असून, मालवाहतुकीचे दर वाढत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू आणि ...

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा वाहनचालकांना त्रास होत असून, मालवाहतुकीचे दर वाढत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू आणि धान्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीचा फटका गरीब आणि सामान्यांना बसत आहे. केंद्र सरकारने अनावश्यक करांची कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची व्यापारी आणि नागरिकांची मागणी आहे. वर्षभरात पेट्रोल २३ रुपये, तर डिझेल २४ रुपयांनी वाढले आहे, हे विशेष.
गेल्यावर्षी कोरोना काळात लॉकडाऊनमुळे उद्योग आणि मालवाहतूक बंद होती. यावर्षीही दीड महिन्यापासून डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे ७० टक्के मालवाहतूक बंद आहे. डिझेलचे दर ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणात मालवाहतुकीचेही दर वाढले नाहीत. त्यामुळे अनेक ट्रक जागीच उभे आहेत. त्याचा फटका ट्रान्सपोर्टर्सला बसला आहे. त्यांचे बँकांचे कर्ज, व्याज, ड्रायव्हर व क्लिनरचा पगार सुरूच आहे. अनेकांनी सहा महिन्यांपासून ट्रकचे बँकांचे हप्ते फेडले नाहीत. अशांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. कोरोना आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने ट्रान्सपोर्टर्स संकटात आले आहेत.
नागपूर ट्रकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष कुक्कु मारवाह म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीने नागपुरात जवळपास १० ते १२ हजार ट्रक जागेवर उभे आहेत. उत्पन्न नसल्याने बँकांचे हप्ते थकले आहेत. काम मिळत नसल्याने अनेकांनी ट्रक विक्रीला काढले आहे. वर्षभरात डिझेलचे दर २४ रुपये लिटर वाढले, पण मालवाहतुकीचे दर ‘जैसे थे’ आहेत. सध्या हा व्यवसाय जोखमीचा झाला आहे. ट्रक उभा राहण्याऐवजी ट्रान्सपोर्टर तोट्यातच मालवाहतूक करीत आहेत. अशी स्थिती आणखी काही महिने राहिल्यास अनेक ट्रान्सपोर्टर्सपुढे घरदार विकल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे किराणा वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांना किराणा वस्तू महागात खरेदी कराव्या लागत आहे. इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडतील.
नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची ओरड सुरू आहे. दरवाढीच खापर ग्राहक किरकोळ दुकानदारांवर फोडतात, हे चुकीचे आहे. मालवाहतुकीचे दर कमी झाल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर काही प्रमाणात कमी होतील.