आश्वासनाची पूर्तता करा
By Admin | Updated: June 22, 2017 02:25 IST2017-06-22T02:25:52+5:302017-06-22T02:25:52+5:30
नागपूर लोकसभा निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करा या मागणीसाठी भीमसेनेच्या वतीने इंदोरा चौकातून ...

आश्वासनाची पूर्तता करा
भीमसेनेची गडकरी यांच्याकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करा या मागणीसाठी भीमसेनेच्या वतीने इंदोरा चौकातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर मोर्चाचे आयोजन केले. मोर्चाचे स्वरूप पाहून हा मोर्चा पाचपावली पोलीस ठाण्याजवळ अडविण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने गडकरींच्या स्विय सहायकांना निवेदन सादर केले.
झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या, शहरातील १० लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, एसएनडीएल कंपनीचा करार रद्द करून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला काम द्यावे, नागपूर शहरातील ४० टक्के अनुसूचित जाती, जमातीतील, शोषित, पीडित, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना राहण्यासाठी घर, मेट्रो रेल्वे, मिहान, कोराडी थर्मल पॉवर, मौदा थर्मल पॉवरमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, मुस्लिमांना समान अधिकार, दिल्लीत ख्रिश्चन ननवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, बेरोजगारांना मासिक पाच हजार भत्ता आदी मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी रेटून धरल्या. इंदोरा चौकातून भव्य मोर्चा काढल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाण्याजवळ हा मोर्चा अडवून धरला. त्यानंतर भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर साळवे, केंद्रीय प्रभारी मनोज बंसोड, राजा नगराळे, आकाश टेंभुर्णे, डॉ. महेश अंबादे, अज्जू शेख, तारीक शेख, राजेश पेंटर, दानिश आगाशे, सोनू सांगोडे, रविकांत जनबंधु, साधना काटकर, नेहा तेजवानी यांच्या शिष्टमंडळाने नितीन गडकरींचे स्विय सहायक दीक्षित यांना निवेदन सादर केले. निवेदनावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दीक्षित यांनी गडकरींच्या वतीने शिष्टमंडळास दिले. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.