अभियंत्यापासून हप्ता वसुली
By Admin | Updated: July 4, 2014 01:14 IST2014-07-04T01:14:12+5:302014-07-04T01:14:12+5:30
बदनामी करण्याची धमकी देऊन सिंचन विभागातील अभियंत्यापासून ५० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. ही घटना मानेवाडा चौकात घडली. बदनामीच्या भीतीने अभियंत्याने दोन दिवसानंतर

अभियंत्यापासून हप्ता वसुली
५० हजार घेतले : बदनामीची भीती दाखवून घेतले पैसे
नागपूर : बदनामी करण्याची धमकी देऊन सिंचन विभागातील अभियंत्यापासून ५० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. ही घटना मानेवाडा चौकात घडली. बदनामीच्या भीतीने अभियंत्याने दोन दिवसानंतर या विरोधात तक्रार दाखल केली.
मानेवाडा मार्गावरील रहिवासी राम दशपुत्रे सिंचन विभागात अभियंता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना २९ जूनच्या रात्री १० वाजता एका व्यक्तीने दूरध्वनीवरून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा मानेवाडा चौकात अपघात झाल्याची माहिती दिली. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने त्यांना तातडीने मानेवाडा चौकात पोहोचण्यास सांगितले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून दशपुत्रे मानेवाडा चौकात पोहोचले. मानेवाडा चौकात दशपुत्रे यांना तीन पुरुष आणि एक महिला दिसली.
पुरुषांनी त्यांना धमकावून संबंधित महिलेशी संबंध ठेवण्याचा आरोप लावला. परंतु दशपुत्रे महिला आणि पुरुष यांना ओळखतच नव्हते. त्यांनी महिलेला ओळखण्यास नकार देऊन तिच्याशी कुठलेच संबंध नसल्याचे सांगितले.
त्यानंतर या महिलेसोबत असलेल्या पुरुषांनी त्यांची पोलिसात चांगली ओळख असल्याची बतावणी करून तक्रार देण्याची धमकी दिली. तक्रार दिल्यानंतर तुमची बदनामी होईल, अशी भीतीही त्यांना दाखविण्यात आली. तक्रार टाळायची असल्यास ५० हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या धमकीमुळे दशपुत्रे घाबरले. त्यांनी पत्नीला फोन करून महत्त्वाच्या कामासाठी ५० हजार रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांच्या पत्नीकडे कमी रक्कम असल्यामुळे त्यांनी मित्रांकडून पैसे उसने घेतले. आरोपींनी दशपुत्रे यांच्या घरी जाऊन पैसे घेतले. घटनेची माहिती कुणालाही दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु ही माहिती दशपुत्रे यांनी पत्नीला सांगितली. बदनामीच्या भीतीने दशपुत्रे यांनी याविरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. मित्रांनी दबाव टाकल्यामुळे त्यांनी बुधवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)
आठवड्यातील तिसरी घटना
दशपुत्रे यांच्यासोबत घडलेली घटना ही आठवड्यातील तीसरी घटना आहे. मागील आठवड्यात फ्रेंड्स कॉलनीत विमा एजंट होऊन एका तरुणाला लुटले होते. कोराडीतही एका वेश्येसोबत गेलेल्या एका तरुण व्यापाऱ्याचा मोबाईल आणि ३० हजार रुपये लुटण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना नेहमीच होत असून बदनामीच्या भीतीने या घटना पुढे येत नाहीत. या घटनांमुळे शहरात संघटित गुन्हेगारी सक्रिय होत आहे.