पाणीपट्टीची पहिल्याच दिवशी ४० लाखांची वसुली
By Admin | Updated: June 17, 2016 03:17 IST2016-06-17T03:17:59+5:302016-06-17T03:17:59+5:30
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने थकीत पाणीपट्टीच्या ५० टक्के रक्कम एकमुस्त भरून बिलाची पाटी कोरी करण्याची मोहीम सुरू केली आहे.

पाणीपट्टीची पहिल्याच दिवशी ४० लाखांची वसुली
५० टक्के सवलत : ८१८ उपभोक्त्यांची बिलाची पाटी कोरी
नागपूर : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने थकीत पाणीपट्टीच्या ५० टक्के रक्कम एकमुस्त भरून बिलाची पाटी कोरी करण्याची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी शहरातील ८१८ उपभोक्यांनी ४० लाख ४५ हजार १२६ रुपयांची थकबाकी भरून बिलाची पाटी कोरी केल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, गिरीश देशमुख आदी उपस्थित होते.
अनेक ग्राहकांच्या पाणी बिलासंदर्भात तक्रारी होत्या. काहींना सरासरीच्या तुलनेत अधिक बिल पाठविण्यात आले होते. काहींनी नवीन बांधकाम केले. कुठे दुसरीकडे वास्तव्यास गेले आहे. तसेच पाण्याचा वापर नसताना अधिक बिल पाठविण्यात आल्याच्या तक्रारींचा यात समावेश आहे. यामुळे थकबाकी वाढत गेली. गेल्या अनेक वर्षापासून ती तशीच कायम आहे. थकबाकीमुळे अनेक उपभोक्त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांच्या सुविधेसाठी जलप्रदाय विभागाने मर्यादित कालावधीसाठी ही योजना आणल्याची माहिती दटके यांनी दिली.
जलप्रदाय विभागाच्या आवाहनाला थकबाकीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी शेकडो लोकांनी थकीत बिलासंदर्भात झोन कार्यालयाकडे संपर्क साधून माहिती घेतली. ८१८ उपभोक्त्यांनी एकमुस्त रकमेचा भरणा केला. तडजोडीसाठी उपभोक्यांची गर्दी वाढणार आहे. या योजनेमुळे महापालिका व उपभोक्ते या दोघांनाही लाभ होईल, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
शहरातील ६१ केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ३० जून २०१६ पर्यंत ही योजना राबविली जाणार आहे. महापालिकेच्या झोनस्तरावरील केंद्रांव्यतिरिक्त शहरातील बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन बँक व साधना सहकारी बँकेच्या शाखा अशा ६१ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)