पीडित ग्राहकांचे ३.४० लाख रुपये वसूल करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:50+5:302021-02-05T04:46:50+5:30
नागपूर : यादव ब्रदर्स बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे भागीदार पुरुषोत्तम यादव व प्रभाकर यादव यांच्याकडून दोन पीडित ग्राहकांना ३ लाख ...

पीडित ग्राहकांचे ३.४० लाख रुपये वसूल करून द्या
नागपूर : यादव ब्रदर्स बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे भागीदार पुरुषोत्तम यादव व प्रभाकर यादव यांच्याकडून दोन पीडित ग्राहकांना ३ लाख ४० हजार रुपये वसूल करून द्या असे निर्देश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच, याकरिता थकीत जमीन महसूल वसुली पद्धतीचा अवलंब करण्यास सांगितले.
सदाशिव अवचट व वीणा सुरकार अशी पीडित ग्राहकांची नावे असून त्यांना आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी दिलासा दिला. संबंधित रकमेत अवचट यांच्या २ लाख ४० हजार तर, सुरकार यांच्या १ लाख रुपयाचा समावेश आहे. अवचट यांना २ लाख १५ हजार आणि सुरकार यांना ७५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह (२२ जुलै २०१४ पासून) वसूल करून द्यायचे आहेत. उर्वरित रकमेत शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चाच्या भरपाईचा समावेश आहे.
मालमत्ता खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे दोन्ही ग्राहकांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने २२ मे २०१९ रोजी ती तक्रार निकाली काढून संबंधित रक्कम ग्राहकांना अदा करण्याचे आदेश यादव ब्रदर्सना दिले होते. आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता. त्या वेळेत आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकांनी आयोगामध्ये अर्ज दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्याची विनंती केली. त्यात आयोगाने हे निर्देश दिले.