नववर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रोत ‘रेकॉर्ड रायडरशिप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:04+5:302021-01-03T04:12:04+5:30
नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांमध्ये अचानक वाढ झाली. १५,४११ पेक्षा अधिक प्रवाशांनी अॅक्वा लाईन मार्गावर प्रवास ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रोत ‘रेकॉर्ड रायडरशिप’
नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांमध्ये अचानक वाढ झाली. १५,४११ पेक्षा अधिक प्रवाशांनी अॅक्वा लाईन मार्गावर प्रवास केला. आतापर्यंतचा हा मोठा उच्चांक आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२१ रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधकामासाठी ऑरेंज लाईन मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीदरम्यान प्रवासी वाहतूक बंद होती. एकच मेट्रो लाईन असूनही प्रवाशांनी मेट्रोच्या प्रवासासाठी गर्दी केली होती.
अनलॉकनंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नववर्षाच्या अखेरच्या रविवारी प्रवाशांनी मेट्रो रेल्वेत गर्दी केली होती. २२,१२३ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. इतर दिवशीही मेट्रोची प्रवासी संख्या १० हजारावर आहे. नागपुरात २५ किलोमीटर अंतराचे मेट्रोचे जाळे प्रवाशांसाठी उपलब्ध असून दर १५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी सज्ज राहते. सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी आणि सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा उपलब्ध आहे. महामेट्रोच्या वतीने प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मेट्रो प्रवासासोबत आपली स्वत:ची किंवा फिडर सर्व्हिस म्हणजे उपलब्ध सायकलदेखील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मेट्रो रेल्वेत नेता येऊ शकते. मेट्रो रेल्वेची सेलिब्रेशन ऑन व्हील्स या योजनेंतर्गत ३ हजार रुपयात ३ कोचच्या मेट्रो रेल्वेत वाढदिवस, प्री वेडिंग शुट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरे करणे शक्य झाले आहे. महामेट्रोच्या वतीने नववर्षानिमित्त न्यू ईअर कार्निव्हलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. येथे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स उपलब्ध आहेत. याशिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरणपूरक वस्तूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोयीसुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महामेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
..............