मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 11:47 AM2021-10-08T11:47:13+5:302021-10-08T12:27:39+5:30

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे.

Reconstruction of 50 wards in a month | मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना

मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना

Next
ठळक मुद्देतीन सदस्यांनुसार पुनर्रचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे.

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच्या आदेशानुसार एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार प्रभागाची रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. काम अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभागानुसार महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सुधारित आदेश जारी केले आहेत.

भाजप -शिवसेना युती सरकारने १९ मे २०१६ रोजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा आदेश काढला होता. राज्यातील सर्व महापालिकांत ही पद्धती लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून नियमात दुरुस्ती केली होती. परंतु, २०१९ ला राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा आदेश २०२० मध्ये रद्द केला होता. मात्र, महाविकास आघाडीने हा निर्णय रद्द करून त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला आहे.

आक्षेपांवरील सुनावणीनंतर अंतिम स्वरुप

मनपा प्रशासनाच्या चमूद्वारे तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केल्यानंतर, तो निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. आयोगाकडून तो प्रकाशित केला जाईल. त्यावर आक्षेप व सूचना मागितल्या जातील. यावर सुनावणी झाल्यानंतर प्रभागरचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

५० हजार मतदारांच्या आसपास मतदार

चार सदस्यीय प्रभागात ६५ ते ७० हजार मतदार आहेत. याचा विचार करता तीन सदस्यीय प्रभागात ५० हजारांच्या आसपास मतदार राहतील. तीन सदस्यीय प्रभागानुसार निवडणूक होणार असल्याने अपक्ष उमेदवारांच्या इच्छेवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार निवडणूक होणार असल्याचे गृहीत धरून अनेकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. मात्र, आता ही निवडणूक त्यांच्या बजेटच्या बाहेर गेली आहे.

Web Title: Reconstruction of 50 wards in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.