बुवा-बाबांची ‘चलाखी’ ओळखा

By Admin | Updated: July 4, 2015 03:10 IST2015-07-04T03:10:55+5:302015-07-04T03:10:55+5:30

बुवा-बाबांच्या प्रयोगामागे दैवी शक्ती नाही तर हातचलाखी आहे, असे सांगत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संघटक..

Recognize Buva-Baba's 'trick' | बुवा-बाबांची ‘चलाखी’ ओळखा

बुवा-बाबांची ‘चलाखी’ ओळखा

जादूटोणाविरोधी कायदा : पोलिसांना प्रशिक्षण
नागपूर : बुवा-बाबांच्या प्रयोगामागे दैवी शक्ती नाही तर हातचलाखी आहे, असे सांगत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संघटक तसेच सरकारच्या जादुटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना हवेत हात फिरवून कधी सोनसाखळी तर कधी सोन्याची अंगठी काढून दाखवली.
अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक भागात अघोरी प्रथा सुरू आहेत. जादूटोण्याच्या नावाखाली निष्पाप व्यक्तींचे बळी घेतले जातात. काय आहे हा कायदा, कशी करायची त्याची अंमलबजावणी त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रा. श्याम मानव यांनी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहर आणि ग्रामीण तसेच वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा येथील पोलीस जिमखान्यात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रा. मानव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ‘जादूटोणा विरोधी कायदा’ काय आहे, त्याची बारीक सारीक माहिती दिली. या कायद्याची व्यापकता आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कोणती भूमिका घ्यायची, त्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
दडपण आणणाराही गुन्हेगार
कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण करणारा किंवा गुन्हेगाराच्या बचावासाठी पुढे येणारासुद्धा या कायद्यातील तरतुदीनुसार तेवढाच गुन्हेगार मानला जातो, असे सांगताना मानव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना उदाहरण दिले की, ‘जादूटोणा करतो असा आरोप लावून कुण्या व्यक्तीवर कुणी अन्याय अत्याचार केला. तपासात हे उघड झाले आणि त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. नेमक्या वेळी त्या आरोपीच्या बचावासाठी एखाद्या आमदाराने फोन केला आणि आरोपीला सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले. तर, कलम ३, २ अन्वये तेसुद्धा बरोबरीचे गुन्हेगार ठरतात. त्यामुळे संबंधितांच्या हे एकदा लक्षात आणून दिले की या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही’, असे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title: Recognize Buva-Baba's 'trick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.