वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक
By Admin | Updated: September 1, 2014 01:08 IST2014-09-01T01:08:15+5:302014-09-01T01:08:15+5:30
स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान होते, असे सांगून येणाऱ्या काळात वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत नरकेसरी प्रकाशनचे

वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक
विलास डांगरे : ग्रंथालय भारतीचा पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर : स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान होते, असे सांगून येणाऱ्या काळात वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे यांनी व्यक्त केले.
ग्रंथालय भारतीतर्फे आज, रविवारी लक्ष्मीनगरातील सुयोग मंगल कार्यालयात डॉ. श्री. गो. काशीकर स्मृती समाज प्रबोधनपर साहित्य पुरस्कार व मंगला गोविंद पांडे स्मृती उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार वितरण आणि ‘ग्रंथ भारती’ या त्रैमासिकाच्या प्रथम अंकाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. आमदार अनिल सोले प्रमुख अतिथी होते.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बाबा देशपांडे, सचिव डॉ. माधव पात्रीकर, कार्याध्यक्ष डॉ. सुधीर बोधनकर, प्रायोजक रवींद्र पांडे व मोहन काशीकर उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे केवळ वाचनाची आवड कमी झाली आहे, वाचन संस्कृती पूर्णपणे संपलेली नाही. विशेषत: तरुण वर्ग वाचनापासून दुरावला आहे. पूर्वी शालेय जीवनापासूनच वाचनाचे संस्कार होत होते. पुस्तके वाचून अभ्यासाची टिपणे काढावी लागत होती. आता संगणकावर हवे ते प्राप्त होते. जुने ते टाकावू असे न समजता चांगल्या सवयी कायम टिकविल्या पाहिजे. विकासासोबत मूल्यांचेही जतन करणे आवश्यक आहे, असे डांगरे यांनी पुढे सांगितले.
सोले म्हणाले, वाचन संस्कृती टिकविण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून नागपुरात राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत वाचन कमी झाले आहे. मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे.
डांगरे व सोले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण व त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
ग्रंथ परीक्षण समितीमधील डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. भास्कर भांदककर, डॉ. लिना निकम, डॉ. शुभा साठे, डॉ. आर. एन. देशपांडे, डॉ. डी. आर. देशपांडे व डॉ. सविता भालेराव यांच्यासह प्रायोजकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी
डॉ. श्री. गो. काशीकर स्मृती समाज प्रबोधनपर साहित्य पुरस्कार
प्रथम : वसुधा परांजपे, पुणे (पुस्तक - समईच्या शुभ्रकळ्या, प्रकाशक - स्नेहल प्रकाशन पुणे)
द्वितीय : प्रा. अरविंद खांडेकर, नागपूर (पुस्तक - अमृताचा वसा, प्रकाशक - ऋचा प्रकाशन)
तृतीय : डॉ. संगीता टक्कामोरे, रामटेक (पुस्तक - विदर्भातील आर्थिक आणि सामाजिक विचार, प्रकाशक - मंगेश प्रकाशन), डॉ. किशोर महाबळ, नागपूर (पुस्तक - बुधवारची शाळा, प्रकाशक - विसा बुक्स)
मंगला गोविंद पांडे स्मृती
उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
प्रथम : बबन आखरे, दस्तुर रतनजी ग्रंथालय, खामगाव, जि. बुलडाणा
द्वितीय : सुरेश पट्टलवार, सार्वजनिक वाचनालय, परतवाडा, जि. अमरावती.(प्रतिनिधी)