लोकमत दीपोत्सवला वाचकांची प्रथम पसंती

By Admin | Updated: November 14, 2015 03:19 IST2015-11-14T03:19:00+5:302015-11-14T03:19:00+5:30

कंगना राणावत ते सनी लियॉन आणि नारायण मूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांच्या मुलाखतीतून त्यांचे अंतरंग उलगडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सवला यंदा वाचकांनी प्रथम पसंती दिली आहे.

Readers' preference for Lokmat Deepawas | लोकमत दीपोत्सवला वाचकांची प्रथम पसंती

लोकमत दीपोत्सवला वाचकांची प्रथम पसंती

लोकमत दीपोत्सवला वाचकांची प्रथम पसंती

कंगना राणावत ते सनी लियॉन आणि नारायण मूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांच्या मुलाखतीतून त्यांचे अंतरंग उलगडणाऱ्या लोकमतच्या दीपोत्सवला यंदा वाचकांनी प्रथम पसंती दिली आहे. राज्यातील सर्वाधिक खपाचा विक्रम करणारा दीपोत्सव यावर्षीही ही परंपरा कायम राखेल, असा विश्वास वाचकांनीच सार्थ ठरविला असून दीपोत्सवची मांडणी आणि वेगळ्या विषयावरच्या लेखनाचे कौतुक केले आहे. अनेकांनी काही मोजके अंक खरेदी करताना दीपोत्सव टाळणे शक्यच होत नाही, अशी कबुली यावेळी दिली. तर वाचकांनी दीपोत्सव हातात घेतल्यावर त्यातील नव्या विषयांच्या आणि आधुनिक मांडणीच्या शैलीमुळे वाचकांनी दीपोत्सवची मागणी केली असल्याचे मत प्रमोद मुळे यांनी व्यक्त केले.

दिवाळी अंकाची क्रेझ कायमच : जरा वेगळे विषय, विनोद आणि वैचारिकतेला स्थान

दिवाळी अंकांचा भरगच्च वाचन फराळ

नागपूर : संगणकाच्या काळात दिवाळी अंक भविष्यात वाचले जाणार नाहीत. त्यासाठी डिजिटल अंकच काढावे लागतील, असे भाकीत काही वर्षापूर्वी जाणकारांनी केले होते. स्वाभाविकपणे संगणक युगात हा बदल अपरिहार्यतेने होईल, असे गृहित धरण्यात आले होते. पण सध्या नेमकी उलट स्थिती आहे. मुद्रित माध्यमाची जादू अद्याप ओसरलेली नाही. भरपूर दिवाळी अंकांचे प्रकाशन यंदाच्या दिवाळीत नेहमीप्रमाणेच करण्यात आले आणि त्याचा वाचकवर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रकाशक आणि विक्रेते यांची दिवाळी आनंदाची झाली आहे. त्याशिवाय वाचकांनाही वेगवेगळे, हटके आणि मनोरंजक, विनोदी विषय मिळाल्याने वाचकांचाही वाचन फराळ दिवाळीच्या आनंदात भर घालतो आहे.
महाराष्ट्रात दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. सातत्याने दिवाळी अंकाला मागणी असल्याने अनेक प्रकाशन संस्था आणि मीडिया हाऊसने दिवाळी अंकांच्या या परंपरेत आपले योगदान दिले. या सर्वच दिवाळी अंकाना वाचकांनी पसंती दिली. कथा, कविता, दीर्घकथा, स्फुटलेखन, प्रवासवर्णने, ज्योतिष, अध्यात्म ही दिवाळी अंकांची ढोबळ वैशिष्ट्ये होती. काही अंक आजही सर्वसमावेशक आहेत. मधल्या काळात काही निवडक प्रकाशन संस्था वगळता दिवाळी अंकांचे चलन थोडे कमी झाले. पण त्यानंतर गेल्या काही वर्षात दिवाळी अंकांचे स्वरूप काहिसे बदलले. त्यांची मांडणी, त्यात येणारी आधुनिकता, नवता आणि विशिष्ट विषयांना किंवा विचारांना समर्पित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकांनी वाचकांना आकर्षित केले. काही विनोदी, काही जरा चावट, काही वैचारिक मंथन करणारे, काही तंत्रज्ञान आणि विज्ञानाला वाहिलेले, काही दिवाळी अंकात केवळ कथा, काहींमध्ये कविता असे वर्गीकरण अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी केले. त्यामुळे संबंधित विषयांचा अभ्यास आणि आवड असणाऱ्या वाचकांनी या दिवाळी अंकाना खास पसंती दिली आणि दिवाळी अंकाचा खप विक्रमी वाढला.प्रत्येकासाठी आणि कुटुंबातील सर्वांसाठी दिवाळी अंकांचा खजिना दिवाळीच्या दरम्यान उपलब्ध होतो. मनोरंजनासाठी, वैचारिक खाद्य म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी दिवाळी अंकांचे वाचन असते. असे वैचारिक खाद्य देणारे दिवाळी अंक सध्या बाजारात आले आहेत.
बाजारात सध्या २००च्यावर दिवाळी अंक उपलब्ध आहेत. त्यात गंभीर वैचारिक विषय, राजकारण, धार्मिक, आरोग्य, भटकंती, ज्योतिष, पाककृती, सौंदर्यप्रसाधने, विनोद आदी विषयांना वाहिलेले दिवाळी अंक आहेत. स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य राखून असलेले दिवाळी अंकही आहेत. नाती जोडणारे मासिक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री व सौ, सांस्कृतिक समृद्धी अधिक दृढ करणारे अंतर्नाद, वैचारिक धीरगंभीर चर्चा घडवून आणणारे मौज तर वैचारिक मंथन असणारे ‘इत्यादी’, ‘मुशाफिरी’, ‘अनुभव’, ‘धनंजय’, ‘चंद्रकांत’ आदी नामवंत दिवाळी अंक नामवंत लेखकांच्या कथा, कवितांसह उपलब्ध आहेत. उपासना विशेषांक भाग्यनिर्णय, संपूर्ण ज्योतिषविषयक ब्रह्मज्ञान, ज्योतिष, शुभंकर आदींसारखे दिवाळी अंक धार्मिक वाचकांसाठी उपलब्ध आहेत. चालू घडामोडींचा प्रभाव दिवाळी अंकांवर साधारणपणे असतो. महागाई, डाळींच्या भाववाढीचा गोंधळ, शिक्षणाचे खासगीकरण आणि शिक्षणाचे अनेक प्रश्न, पाककृतीवरील अंक, रुचिरा, शतायुषी बरोबरच चाळीशी नंतरचा आहार सांगणारे चटपटीत आरोग्य व आहार विशेष आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या पाककृती तसेच अनेक आजारांवर उपचार सांगणारे शतायुषी आदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत आहेत.
श्रृंगारिक, प्रणय, कामजीवन, प्रणयदर्शन आणि वात्रटिकांवर आधारित तसेच आंबटशौकिनांचा कल लक्षात घेऊन काही अंक खास बाजारात आणले जातात. पण यातही नर्मविनोदी आणि संयत विनोद व वात्रटिका असतात. त्यात आवाज, जत्रा हे विनोदी दिवाळी अंक वाचकांना खुणावत आहेत. पर्यटन, प्रवास, देशाटन अशा विषयांना वाहिलेले भटकंती, ऋतुरंग या दिवाळी अंकांची स्वत:ची वेगळी अशी जागा रसिकांच्या मनात आहे. याशिवाय खास महिलांसाठी मेनका, माहेर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत.शब्दकोडी असलेले फूल टाईमपास, धमाल शब्द कोडी आणि वाचनाचा आनंद देणारे फूल मनोरंजनासारखे दिवाळी अंक वाचकांना आकर्षित करीत आहेत. खास लहान मुलांसाठीही दिवाळी अंक काढण्यात आले आहेत. यात कार्टुन, इसापनिती, बोधकथा आणि विनोद आहेत. काही शब्दकोडे आहेत. काहीत चित्र रंगविण्याची सोय आहे. गणितांची कोडी आणि गमती-जमती आहेत.(प्रतिनिधी)

दिवाळी अंकांना मोठी मागणी
दिवाळी अंकाची मराठीत खास अशी संस्कृती आहे. त्यामुळेच आपण दरवर्षी खास दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करतो आणि त्याला वाचकांचा दरवर्षीच उदंड प्रतिसादही लाभतो. वाचन संस्कृती लोप पावते आहे, अशी चिंता व्यक्त केली जात असताना दिवाळीत मात्र प्रामुख्याने दिवाळी अंक आणि पुस्तके घेण्याचा कल वाढतो आहे, असे माझे निरीक्षण आहे. जुन्या लेखकांसह नव्या लेखकांनाही दिवाळी अंकात संधी देण्यात येत असल्याने युवा वर्गही मोठ्या प्रमाणात दिवाळी अंकाची खरेदी करतो आहे. ही मोठी समाधानाची बाब आहे. त्यात खास तंत्रज्ञान, विज्ञानाला वाहिलेली दिवाळी अंकही सध्या उपलब्ध आहेत. साधारणत: मेनका, माहेर, ग्रहांकित, धनुर्धारी, मौज दीपावली हे दिवाळी अंक प्रचलित आहेत. वैचारिक बाजूने जाणारी इत्यादी, अनुभव, अंतर्नाद, मुशाफिरी, धनंजय, चंद्रकांत या अंकांनाही मागणी आहे. तर नवल, हंस आणि मोहिनी या अंकांची मागणी सातत्याने वाढतेच आहे. दीपोत्सव अंकालाही वाचकांनी त्यांच्या वेगळ्या विषयामुळे मागणी आहे. दिवाळी अंकाचे हे विशेष प्रदर्शन राणा प्रताप सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग, शंकरनगर येथे २२ नोव्हेंबरपर्यंत वाचकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले आहे.
प्रमोद मुळे, फेमस बुक डेपोचे संचालक व प्रदर्शन आयोजक

Web Title: Readers' preference for Lokmat Deepawas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.