अंदाजपत्रकावरील शेती अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:08+5:302021-02-05T04:45:08+5:30
अर्थमंत्री महाेदयांनी पैसा कुठून गाेळा हाेणार हे स्पष्ट केले नाही, हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कापसाच्या आयातीवर १० ...

अंदाजपत्रकावरील शेती अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
अर्थमंत्री महाेदयांनी पैसा कुठून गाेळा हाेणार हे स्पष्ट केले नाही, हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कापसाच्या आयातीवर १० टक्के आयात कर लावल्याने कापसाची आयात कमी हाेईल आणि देशांतर्गत देशी कापसाची मागणी वाढेल. त्यामुळे देशी कापसाचा चांगला भाव मिळेल. देशात सात टेक्साईल पार्क निर्माण करण्याची घाेषणा स्वागतार्ह आहे. ते क्लस्टर बेस असल्याने यातून कापसाच्या उत्पादन वाढीस मदत हाेईल, तसेच राेजगार निर्मिती हाेईल.
- डाॅ. श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ज्ञ.
...
कापसावरील आयकत कर स्वागतार्ह
शासनाने कापसावर १० टक्के आयात कर लावण्याची चांगली तरतूद केली आहे. त्यामुळे गिरणी मालकांना कापसाची आयात करून देशांतर्गत कापसाचे भाव पाडणे शक्य हाेणार नाही. याचा अप्रत्यक्ष फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हाेईल. शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट हाेईल, असे सांगितले, पण त्याची व्याख्या केली नाही.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते.
...
अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाला प्राधान्य मिळेल
आयात कर लावल्याने कापसाची आयात करण्यासाठी अधिक पैसा माेजावा लागेल. त्यामुळे देशांतर्गत कापसाची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळू शकेल. आपण अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयात करताे. आयात महाग झाल्याने आपल्या देशात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या उत्पादनाला प्राेत्साहन मिळेल. त्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. त्यातून आपण स्वयंपूर्ण हाेऊ शकताे.
- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य.
...
तेल व डाळवर्गीय पिके उपेक्षितच
कापसाच्या आयातीवर लावलेला कर ही स्वागतार्ह बाब आहे. शासनाने गहुू, धान, कापूस या शेतमालाच्या संदर्भात किमान आधारभूत किमतीची भूमिका घेतली, ती तेलबिया व डाळवर्गीय पिकांबाबत घेतली नाही. ती घेणे गरजेचे हाेते. सूक्ष्म सिंचनासाठी केलेली १० हजार काेटी रुपयांची तरतूद कमी आहे. सरकारने शेतमाल प्रक्रिया उद्याेग उभारणीतील पायाभूत सुविधांचे तसेच फार्मर प्राेड्यूसर कंपनीबाबतचे धाेरण स्पष्ट केले नाही.
- मनाेज जवंजाळ, अध्यक्ष, नागपुरी संत्रा फार्मर प्राेड्युसर कंपनी.
...
लांब धाग्याच्या कापसाचे क्षेत्र वाढेल
देशात पहिल्यांदाच कापसाच्या आयातीवर कर लावण्यात आला आहे. ही चांगली बाब आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा हाेईल. यातून लांब व अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची लागवड व उत्पादन वाढेल. या कापसाच्या उत्पादनाला प्राेत्साहन मिळेल. कापसासाेबत कापूस उत्पादकांना आधार मिळेल.
- अशाेक निलावार, शेतकरी.
...