नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा
By Admin | Updated: July 29, 2015 03:10 IST2015-07-29T03:10:24+5:302015-07-29T03:10:24+5:30
विदर्भात लिंबूवर्गीय फळझाडांवर कोळशीसारख्या विषाणूजन्य आजाराची मोठी समस्या आहे.

नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा
सीसीआरआयचा स्थापना दिन : चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले विचार
नागपूर : विदर्भात लिंबूवर्गीय फळझाडांवर कोळशीसारख्या विषाणूजन्य आजाराची मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करणे आवश्यक आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र(सीसीआरआय) ही संशोधन करणारी संस्था आहे आणि येथील वैज्ञानिकांनी मोलाचे काम करीत संशोधन करून अनेक रोगमुक्त प्रजाती तयार केल्या आहेत. मात्र हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. त्यामुळे वैज्ञानिकांनी उत्पादन नाही तर तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी केले.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या ३० व्या स्थापना दिनानिमित्त्य मंगळवारी ‘लिंबूवर्गीय फळांवरील विषाणूजन्य आजारांचे आव्हान व भविष्यातील त्यांचे निराकरण‘ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मायी बोलत होते. यावेळी भारतीय कृषी संशोधन केंद्राचे उपमहासंचालक डॉ.पी.के. चक्रवर्ती, जबलपूर येथील कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. एस.एम. पॉलखुराना, प्रो.वाय.एस. अहलावत, सीसीआरआयचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मायी पुढे म्हणाले की, आपल्या देशात कृषी क्षेत्रात वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा समाज लवकर स्वीकार करीत नाही. मात्र संशोधकांनी विकसित केलेले तंत्रज्ञान सरकारने लोकांपर्यंत पोहचवावे. एकेकाळी अमेरिकेतही तीच परिस्थिती होती. मात्र आज तेथील संत्रा उत्पादकांचे ट्रापिकाना ज्यूस जगभर विकल्या जातो. विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पादन जगभरात विकले जावे, अशी सदिच्छा डॉ. मायी यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. पॉलखुराना यांनी कृषी संशोधनाच्या क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. लिंबूवर्गीय फळ, पोटॅटो या फळांच्या उत्पादनात सारख्याच समस्या आहेत.
संशोधकांनी मेक इन इंडिया, यूज इन इंडिया आणि एक्सपोर्ट टू वर्ल्ड या धर्तीवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिलीप घोष तर आभार प्रदर्शन डॉ. ए.के. दास यांनी केले. (प्रतिनिधी)