मनोरुग्णालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:30+5:302021-03-14T04:08:30+5:30
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी ३२ वर्षीय महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली. संसर्ग कुठून ...

मनोरुग्णालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी ३२ वर्षीय महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली. संसर्ग कुठून झाला याचा रुग्णालय प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. तिच्या संपर्कात आलेल्या ६० महिला रुग्णांची सोमवारी चाचणी होणार आहे. बाधित रुग्ण महिलेला तूर्तास लक्षणे नाहीत. यामुळे रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे.
मनोरुग्णालयात ऑगस्ट २०२० मध्ये ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १०० रुग्णांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. परंतु कोणीच पॉझिटिव्ह आले नव्हते. परंतु आता मागील दहा दिवसांपूर्वी रुग्णालयातील दोन क्लार्क पॉझिटिव्ह आले. ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात असताना शुक्रवारी ३२ वर्षीय महिलेला ताप आला. दर गुरुवारी रुग्णालयात कोरोनाची तपासणी होत असताना या महिलेची तपासणी केली असता, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु आता लक्षणे नसल्याने रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. ही महिला अनोळखी असून मागील काही महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला प्रतिसाद देत असताना ती पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम रुग्णालयात पाळले जातात. दर गुरुवारी नव्या रुग्णांसोबत लक्षणे आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी केली जाते. यात ही महिला पॉझिटिव्ह आली. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या संपर्कात आलेल्या साधारण ६० महिला रुग्णांची सोमवारी कोरोना तपासणी केली जाईल. सध्या तरी कुणाला लक्षणे नाहीत.