उपराजधानीत आता आरसी झाली पुन्हा ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 21:19 IST2017-11-21T21:12:40+5:302017-11-21T21:19:19+5:30
तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून देण्यात येणाऱ्या वाहन नोंदणीपुस्तकाला (आरसी बुक) पुन्हा एकदा स्मार्ट कार्डचे स्वरूप देण्यात आले आहे.

उपराजधानीत आता आरसी झाली पुन्हा ‘स्मार्ट’
आॅनलाईन लोकमत
नागपूर : तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून देण्यात येणाऱ्या वाहन नोंदणीपुस्तकाला (आरसी बुक) पुन्हा एकदा स्मार्ट कार्डचे स्वरूप देण्यात आले आहे. याचा शुभारंभ बुधवारपासून शहर आरटीओ कार्यालयातून होणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी या स्मार्ट कार्डचे ३९४ रुपये मोजावे लागायचे आता २०० रुपये मोजावे लागणार आहे.
परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बुक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. परंतु जून २०१४ मध्ये स्मार्टकार्ड पुरवठादाराचे कंत्राट संपले. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरूपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्री प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसीची समस्या वाढली होती. आरसी बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोईस्कर आणि कागदाच्या तुलनेत टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदाच्या आरसीबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी‘ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता नागपूर शहर आरटीओ कार्यालयातून होत आहे.
शुल्क झाले कमी
परिवहन विभागाने ‘आरसी’चे ‘स्मार्ट कार्ड’ बनविण्याचे काम ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ कंपनीला दिले आहे. या कंपनीला प्रति स्मार्ट कार्डमधून सुमारे ५४ रुपये ७२ पैसे मिळतील. शिवाय कंपनीला वाहन १.० प्रणालीमधून वाहन ४.० प्रणालीमध्ये डेटा रूपांतरित करावा लागणार आहे. पूर्वी या स्मार्ट कार्डचे ३९४ रुपये मोजावे लागायचे आता २०० रुपये मोजावे लागणार आहे.
‘स्मार्ट कार्ड’साठी करावा लागणार अर्ज
ज्या वाहनधारकांकडे ‘पेपर आरसी’ आहे आणि त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ हवे आहे त्यांना कार्यालयात दुय्यम आरसीसाठी अर्ज करावा लागेल. यात कारसाठी ३०० रुपये तर दुचाकी वाहनासाठी १५० रुपये शुल्कासह स्मार्टकार्डचे २०० रुपये भरावे लागतील.
पेपर आरसीही वैध
शहर कार्यालयाने स्मार्टकार्ड देणे सुरू केले असले तरी जुने ‘पेपर आरसी’ वैध राहील. लवकरच पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातूनही स्मार्टकार्डची योजना सुरू होईल.
शरद जिचकार
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर