कच्चा माल महाग, उद्योगांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:49+5:302020-12-27T04:06:49+5:30
नागपूर : गेल्या काही दिवसात स्टील आणि स्टील संबंधित अन्य कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट ...

कच्चा माल महाग, उद्योगांवर संकट
नागपूर : गेल्या काही दिवसात स्टील आणि स्टील संबंधित अन्य कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम उद्योगांवर पडला आहे. दरवाढीमुळे एमएसएमई क्षेत्राला होणाऱ्या अडचणींपासून बाहेर काढण्यासाठी चिंतित उद्योगांनी हस्तक्षेप करण्याची सरकारकडे मागणी केली आहे.
या विषयावर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (बीएमए), एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन (एमआयए), सीआयआय, लघु उद्योग भारती, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योजक म्हणाले, स्टीलच्या किमतीत १८ हजारांची वाढ होऊन ५५ हजार रुपये टन, आयरन ओर ३ हजारांहून ६ हजार रुपये टन, तांबे ४.५ लाखांहून ८.८० लाख रुपये टन, पीव्हीसी रेजिन ६० हजारांहून १.४० लाख रुपये टन, नायट्रिक अॅसिड ९ हजारांहून २१ हजार रुपये टनावर गेल्या आहेत. दरवाढीची स्थिती पुढेही कायम राहिल्यास त्याचा आत्मनिर्भर भारत अभियानावर प्रतिकुल परिणाम होणार आहे. कोरोनाचा महामारीचा परिणाम अजूनही उद्योगांवर दिसून येत आहे. त्यातच कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे ऑर्डर रद्द होत आहेत आणि विक्रीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. निर्यातीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणामुळे उद्योजकांनी केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दरवाढीवर मत मांडले आहे.
उद्योजक म्हणाले, विदर्भात प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्र कार्यरत असून दरवाढीच्या प्रतिकूल परिणामाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार आहे. या क्षेत्रात उत्साह संचारण्यासाठी सरकारला आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतरही पुरेशा माल उद्योगांना मिळत नाही. त्यापासून तयार होणाऱ्या फिनिश वस्तूंचे दरही वाढले आहेत. विशेषत: इलेक्ट्रिकल स्टील, पीव्हीसी, आयरन ओर, स्टील स्क्रॅप आदी कच्च्या मालाची किंमत वाढल्याने उद्योगांची गुंतवणूक वाढली आहे. रोकडअभावी उद्योगांना काम करणे कठीण झाले आहे. अन्य देशातून कच्च्या मालाची आयात व्हायची तेव्हा किमतीत आटोक्यात होत्या. पण आता त्यावर प्रतिबंध लागल्याने देशांतर्गत किमती अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक बाजाराच्या स्पर्धेत फिनिश मालाची किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे निर्यात पूर्णपणे प्रभावित झाली आहे.
बैठकीत सुरेश राठी, अतुल पांडे, चंद्रशेखर शेगावकर, प्रदीप खंडेलवाल, नितीन लोणकर, राहुल दीक्षित, श्रीकांत धोंड्रीकर आणि अन्य उद्योजक उपस्थित होते.