राऊत, चतुर्वेदी चढले देवडियाची पायरी
By Admin | Updated: January 9, 2017 02:54 IST2017-01-09T02:54:06+5:302017-01-09T02:54:06+5:30
गांधी जयंतीचे दोन वेगवेगळे कार्यक्रम, नोटाबंदीची वेगवेगळी आंदोलने, वेगवेगळे मेळावे घेणार, काँग्रेसच्या

राऊत, चतुर्वेदी चढले देवडियाची पायरी
कार्यकर्त्यांच्या तिकिटांसाठी नमते : काँग्रेसच्या मुलाखतींना उपस्थिती
नागपूर : गांधी जयंतीचे दोन वेगवेगळे कार्यक्रम, नोटाबंदीची वेगवेगळी आंदोलने, वेगवेगळे मेळावे घेणार, काँग्रेसच्या स्थापना दिनासह शहर काँग्रेसचे विविध कार्यक्रम व देवडियातील बैठकांवर बहिष्कार घालणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत अखेर रविवारी देवडिया काँग्रेस भवनाची पायरी चढले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या उपक्रमात ते सहभागी झाले. विशेष म्हणजे पक्ष बळकटीसाठी आजवर काय केले, पुढे जिंकण्यासाठी काय रणनीती आहे, असे प्रश्नही त्यांनी इच्छुक उमेदवारांना विचारले.
विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत पदे देण्यात आली, असा आक्षेप घेत राऊत व चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली होती.
संबंधितांना पदमुक्त केले जाईपर्यंत शहर काँग्रेसच्या कुठल्याही उपक्रमात सहभागी न होण्याची भूमिका या दोन्ही नेत्यांनी घेतली होती. यामुळे शहर काँग्रेसच्या पहिल्या तीन बैठकांमध्ये राऊत, चतुर्वेदी समर्थक पदाधिकारी अनुपस्थित राहिले. सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांना पदमुक्त केले जाईल, असा ठराव शहर काँग्रेसने घेतल्यानंतरही ते देवडियाकडे फिरकले नाही. हा वाद दिल्ली, मुंबईपर्यंत जाऊन पोहचला, मात्र तेथेही सुनावणी झाली नाही. अ.भा. काँग्रेस समितीचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे राऊत, चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, स्थानिक पातळीवरच प्रश्न सोडवा, असा सल्ला मिळाला. वरिष्ठ नेतेही हस्तक्षेप करायला तयार नसल्यामुळे गटबाजी आणखीनच भडकली.
२८ डिसेंबर रोजी नागपुरातील पोलीस लॉनवर मोहन प्रकाश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा स्थापना दिवस कार्यक्रम झाला. स्थापना दिवसाला तरी गटबाजी दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या कार्यक्रमालाही राऊत, चतुर्वेदी आलेच नाहीत. याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. कारण हा कार्यक्रम कुणाचा व्यक्तिगत नव्हे तर पक्षाचा होता. पत्रिकेत नाव असतानाही राऊत, चतुर्वेदी आले नाहीत, हा विषय हायकमांडपर्यंत पोहचविला जाईल, असे कार्यकर्त्यांजवळ सुतोवाच करीत मोहन प्रकाश दिल्लीला रवाना झाले होते.(प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांना तिकीट न मिळण्याची भीती
दुसऱ्याच दिवशी २९ डिसेंबर रोजी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राज्यातील शहर व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत ५ जानेवारीवरून कमी करीत २ जानेवारी करण्यात आली. आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे अर्ज सादरच केला नाही तर तिकीट मिळणार नाही या धास्तीने राऊत, चतुर्वेदी यांच्याकडून कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. बहिष्कारात नेत्यांची साथ देणारे कार्यकर्ते नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवडियाच्या पायऱ्या चढत तिकिटासाठी रांगेत लागल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक संसदीय निवड समितीमध्ये राऊत, चतुर्वेदी यांचा सहभाग आहे. आपण मुलाखती घेण्यासाठी गेलो नाही तर आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या विचारातून संबंधित दोन्ही नेत्यांनी मुलाखतींना हजेरी लावल्याची माहिती आहे.
चव्हाणांच्या भेटीत झाले ‘समाधान’
काँग्रेसने शुक्रवारी राज्यभर नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण वर्धा येथील आंदोलनात सहभागी झाले. सायंकाळी मुंबईला विमानाने परतण्यासाठी ते नागपुरात आले असता, नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी या दोन्ही नेत्यांनी विमानतळावर चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. त्यावर चव्हाण यांनी ही गटबाजी किंवा नाराजी दर्शविण्याची वेळ नसून, विरोधकांवर तुटून पडण्याची वेळ असल्याचे स्पष्ट मत मांडले. कुणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वस्त करीत अधिक ताणण्यापेक्षा कामाला लागा, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला. या वेळी झालेल्या चर्चेने दोन्ही नेत्यांचे ‘समाधान’ झाले, अशी माहिती आहे.
राऊत, चतुर्वेदी समर्थकांना पुन्हा पदे मिळणार का?
शहर काँग्रेसच्या तीन बैठकांना अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून राऊत, चतुर्वेदी समर्थक ब्लॉक अध्यक्षांना बदलून दुसरे ब्लॉक अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर शहर कार्यकारिणीतील सुमारे ४५ पदाधिकारी बदलण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. तीन महिन्याच्या गटबाजीत कार्यकर्त्यांनी निष्ठा दाखवीत राऊत, चतुर्वेदींची साथ दिली. आता दोन्ही नेते काँग्रेसच्या मुलाखती घेण्यासाठी देवडियाची पायरी चढले. कदाचित वादावर पडदा पाडण्यासाठी या नेत्यांच्या शिफारशीनुसार तिकीट वाटपही होईल. पण गटबाजीमुळे ज्यांना पदमुक्त करण्यात आले त्यांना पुन्हा पदे मिळवून देण्यासाठी हे दोन्ही नेते ताकद लावतील का, त्यांना पदे मिळतील का, असा प्रश्न संबंधित कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.