दुर्मिळ योग...कऱ्हांडल्यात पाच बछड्यांसह ‘फेअरी’चे दर्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST2021-02-11T04:08:57+5:302021-02-11T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही दिवसात वाघांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यासाठी पुढचे दिवस उज्ज्वल दिसत ...

दुर्मिळ योग...कऱ्हांडल्यात पाच बछड्यांसह ‘फेअरी’चे दर्शन ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसात वाघांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यासाठी पुढचे दिवस उज्ज्वल दिसत आहेत. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेल्या या अभयारण्यात अलीकडे पर्यटकांना दररोज व्याघ्रदर्शन घडत आहे. अगदी अलीकडे तर ‘फेअरी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या टी-३ या वाघिणीने आपल्या पाच बछड्यांसह पर्यटकांना मुक्तपणे दर्शन दिले आहे. यामुळे पर्यटकांची पावले पुन्हा या अभयारण्याकडे वळायला लागणार आहेत. वन्यजीव अभ्यासकांच्या मते एखादी वाघीण साधारणत: तीन ते चार बछड्यांना जन्म देते. पाच किंवा त्यापेक्षा अधिक बछडे देण्याची घटना शंभरात एखादीच घडते.
बुधवारी सकाळी पर्यटकांना ही वाघिण बछड्यांसह दिसल्यावर अनेकांनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. काही तासातच हा व्हिडीओ व्हायरलही झाला. बुधवारी सकाळी गोठणगाव प्रवेशद्वारातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना अगदी सकाळी पिवळ्या व काळ्या पट्ट्यांचे पाच नवे पाहुणे आपल्या आईसोबत फिरताना दिसले. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक आणि मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांंनी यासंदर्भात ‘लोकमत’कडे पुष्टी दिली. सफारीच्या वेळी आईसह पाच बछडे दिसणे ही उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यासाठी खरोखर आनंदाची घटना आहे. या अभयारण्यात वनविभागाने केलेल्या वाघ संरक्षणाच्या चांगल्या कामाची ही पावती असल्याचे ते म्हणाले. सुधारित अधिवास विकास कामाचा हा परिणाम आहे. एक महिना वयाचे हे बछडे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक गोठणगाव प्रवेशद्वारातून दाखल झाले होते. सफारीदरम्यान या परिसरात कॉलिंग ऐकू आल्याने पर्यटक काही काळ थांबले. प्रतीक्षा सुरू असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून अचानक फेअरी बाहेर आली. तिच्या मागोमाग अगदी लहान वयाचे तीन बछडे बाहेर आले. आईच्या मागोमाग चालत ते काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी गेले. त्यांना सुरक्षित ठेवून वाघिण परत आली. पुन्हा दोन बछड्यांना सोबत घेऊन गेली. हा प्रसंग पाहून पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
नागपूर जिल्ह्याचे माजी मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू म्हणाले, फेअरीने पाच बछड्यांना जन्म दिला असेल तर ही खरोखरच मोठी घटना आहे. वाघांच्या अधिकृत आकडेवारीत याचा उल्लेख अद्याप व्हायचा आहे. या बछड्यांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी आता वनविभागावर पडली आहे. मागील एका वर्षात या अभयारण्याकडे दाखविण्यासारखे विशेष असे काही नव्हते. उलट वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वाघ गमावले. त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाने आता काही काळासाठी हे मार्ग पर्यटकांसाठी बंद करायला हवे, असेही त्यांनी सुचविले.
...
बछड्यांनी आशा केल्या पल्लवीत
जयच्या मृत्यूमुळे मागील काही दिवसात या अभयारण्याची लोकप्रियता घसरली होती. याच काळात तीन बछड्यांसह वाघांची शिकारही झाली होती. या पार्श्वभूमीवर, नवीन पाच बछड्यांचे या वनात आगमन झाले आहे. यामुळे त्यांच्या निमित्ताने या अभयारण्याकडे पुन्हा पर्यटकांची पावले वळतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
...