विदर्भात रिफायनरी प्रकल्पासाठी वेगाने हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:30+5:302021-04-20T04:09:30+5:30
नागपूर : ऑइल रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. नुकतेच मुंबईतील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल तज्ज्ञ ...

विदर्भात रिफायनरी प्रकल्पासाठी वेगाने हालचाली
नागपूर : ऑइल रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. नुकतेच मुंबईतील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल तज्ज्ञ विनायक मराठे यांनी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, हा प्रकल्प विदर्भात उभारण्याबाबत माहिती दिली. यानंतर नितीन गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र देत, रिफायनरी प्रकल्प विदर्भाला देण्याचे आवाहन केले. या बैठकीला विदर्भातील रिफायनरी सल्लागार प्रदीप माहेश्वरी आणि जे. एफ. साळवे उपस्थित होते.
भेटीदरम्यान मराठे यांनी रिफायनरीसाठी विदर्भाच्या अनुकूल परिस्थितीवर प्रकाश टाकला. नागपूरच्या ४०० ते ४५० कि.मी.च्या परिघात कोळसा, चुनखडी, लोह व मँगेनीजचे उत्पानद होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा ऑईल रिफायनरी प्रकल्प विदर्भाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे मराठे यांनी सांगितले.
सध्या विदर्भात तेल, पेट्रोकेमिकल्स व पेट्रोलियम पदार्थ ८०० ते १००० कि.मी. अंतरावरून येतात. विदर्भात हा प्रकल्प झाल्यास रत्नागिरीच्या पश्चिम तटावरून नागपूरपर्यंत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर पाईपलाईन टाकून कच्चे तेल इथंपर्यंत आणणे शक्य आणि कमी खर्चाचे आहे. याचप्रमाणे निर्माण झालेले पेट्रोलियम पाईपलाईनद्वारे ५०० कि.मी.च्या परिघात वितरित करता येईल. यामुळे लॉगिस्टिकचा कोट्यवधींचा खर्चही वाचेल, असा दावा त्यांनी केला. शिवाय पेटकॉक, बीटूमेन, पिटीए आदी रसायन परदेशातून आणण्यास लागणारा खर्चही वाचेल. इंडोरामा, सिमेंट कंपन्यांसह लघु उद्योगांनाही प्रकल्पाचा लाभ मिळेल, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला. यासोबत २५ हजार लोकांना प्रत्यक्ष, तर ४ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची हमी त्यांनी दिली. नितीन गडकरी यांनी प्रकल्प उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विदर्भ अनुकूल : गडकरी
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा पत्र सादर केले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी विदर्भ पूर्णपणे अनुकूल असल्याचे सांगत, नागपूरपासून ४० कि.मी.वर १५ हजार एकर जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गोसी खुर्द प्रकल्पासह नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून २०० द.ल.घ.मी. पाणी पुरवठा करण्याची माहिती दिली. जवळपास मोठे जंगल असल्याने कार्बन प्रदूषणाची समस्या येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.