नागपुरात तरुणीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 20:58 IST2018-01-27T20:57:07+5:302018-01-27T20:58:28+5:30
१७ वर्षांच्या मुलाने एका तरुणीशी महिनाभर शरीरसंबंध जोडले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतरही आरोपीने तिला सतत धमकी दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.

नागपुरात तरुणीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १७ वर्षांच्या मुलाने एका तरुणीशी महिनाभर शरीरसंबंध जोडले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतरही आरोपीने तिला सतत धमकी दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले.
आरोपी मुलगा अकरावीत शिकतो तर, तरुणी बीकॉम अंतिम वर्षाला शिकत आहे. दोघेही शांतिनगरात एकाच वस्तीत राहतात. आपसात नातेवाईक असल्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये पीडित तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास भाग पाडले. ती गप्प राहिल्याचे पाहून आरोपी नेहमीच तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. तब्बल महिनाभर त्यांच्यात सतत शरीरसंबंध प्रस्थापित होत राहिल्याने तिला गर्भधारणा झाली. मुलीच्या शरीररचनेत बदल झाल्याचे पाहून आईने तिला विचारणा केली. त्यानंतर डॉक्टरकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले. नात्यातीलच आरोपीने हे कुकृत्य केल्याचे लक्षात आल्याने संबंधित कुटुंबीयांमध्ये वाद झाला. आरोपीने धमकी दिल्यामुळे वाद वाढला. त्यानंतर शुक्रवारी शांतिनगर पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक महेश कुशवाह यांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू आहे.