- नरेश डोंगरे नागपूर - पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील घटनेने राज्यभर खळबळ उडवून दिली असतानाच नागपूर बसस्थानकावर एका विकृतांकडून महिलांसोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे रविवारी या विकृताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा विकृत कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो ४२ वर्षांचा असून, त्याला महिलांशी अश्लिल चाळे करण्याची विकृती जडली आहे. गणेशपेठ बस स्थानकावरील गर्दीत येऊन जवळपास रोजच तो हे कृत्य करीत होता. फलाटावर बस लागल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते. अशा वेळी तो महिला-मुलीच्या मागे उभा राहायचा आणि संधी साधून त्यांच्याशी अश्लिल चाळे करायचा. त्याच्या या कुकृत्याची माहिती बस स्थानकावरच्या शंकर सोनी नामक सुरक्षा रक्षकाला मिळाली. त्यामुळे सोनी त्या नराधमावर नजर ठेवू लागले. नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी तो बसस्थानकावर आला. एक बस फलाटावर लागल्यानंतर आत चढण्यासाठी महिला पुरूष गर्दी करत असल्याचे पाहून तो एका महिलेच्या मागे उभा झाला आणि गेटमधून आत रेटारेटी करत आत चढू लागला.
यापूर्वीही अशाच प्रकारे तो महिलांशी कुकृत्य करीत असल्याचे माहित असल्याने सोनी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मोबाईलमधून त्याचा व्हीडीओ बनविला. नंतर हा नराधम पुन्हा एका महिलेशी लगट करण्याच्या प्रयत्नात असताना त्याची गचांडी धरून त्याला गणेशपेठ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून त्याला अटक केली.
वरिष्ठांकडून गंभीर दखलपुण्यातील स्वारगेट प्रकरणाचे सर्वत्र संतापजनक पडसाद उमटत असतानाच नागपुरात भर दुपारी घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी वरिष्ठांकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संबंधाने एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी माहिती कळताच गणेशपेठ बसस्थानकावर जाऊन तेथे सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. अधिकाऱ्यांना आवश्यक खबरदारीचे आदेश दिले.
पोलिसांसोबत डझनभर महिला होमगार्डगणेशपेठ बसस्थानकावर पोलीस आणि एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आजपासून पोलिसांसोबतच १२ महिला होमगार्ड नियुक्त करण्यात आल्या. दिवसभर त्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहे. सोबतच स्थानकावरील सुरक्षा रक्षक, पर्यवेक्षक, आगार व्यवस्थापक, सुरक्षा व दक्षता खात्याचे अधिकारी, पर्यवेक्षक, विद्युत अभियंता आणि विभाग नियंत्रकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. बस स्थानका परिसरात संशयित व्यक्ती अथवा अनुचित प्रकार दिसल्यास त्याची माहिती या ग्रुपवर माहिती टाकण्याचे यावेळी सांगण्यात आले.