मानवाधिकाराच्या नावाखाली खंडणीखोरी

By Admin | Updated: January 30, 2016 03:05 IST2016-01-30T03:05:54+5:302016-01-30T03:05:54+5:30

मानवाधिकार आयोगाच्या नावाखाली खंडणीखोरी करणाऱ्या एका भामट्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली तर, त्याचे चार साथीदार पसार झाले.

Ransom in the name of human rights | मानवाधिकाराच्या नावाखाली खंडणीखोरी

मानवाधिकाराच्या नावाखाली खंडणीखोरी

व्यापाऱ्याला १० लाखांची मागणी : एक गजाआड, चार फरार
नागपूर : मानवाधिकार आयोगाच्या नावाखाली खंडणीखोरी करणाऱ्या एका भामट्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली तर, त्याचे चार साथीदार पसार झाले. शैलेंद्र ऊर्फ शैलेश खंडारे असे आरोपीचे नाव आहे.
जरीपटक्यातील वसंत गुप्ता नामक व्यापाऱ्याचा वैशालीनगरात सोनपापडीचा कारखाना आहे. चार दिवसांपूर्वी आरोपी खंडारे आपल्या साथीदारांसह कारखान्यात गेला. या सर्वांनी आपण मानवाधिकार आयोगाचे पदाधिकारी असल्याचे सांगून तेथील सोनपापडीचे नमुने ताब्यात घेतले. ही सोनपापडी जनतेच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्यामुळे ‘तुझा कारखाना बंद पाडून तुझ्यावर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल‘, अशी धमकी दिली.
आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या गुप्तांनी कारवाई करू नका, अशी विनवणी केली. आरोपींनी त्याला कारवाई टाळण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली. शेवटी सौदा ४ लाखांवर पक्का झाला. गुरुवारी सायंकाळी आरोपी खंडारे आणि त्याचे चार साथीदार चार लाखांची खंडणी घेण्यासाठी गुप्तांच्या कारखान्यात गेले.
दरम्यान, गुप्तांच्या मित्रांनी खंडणी देण्यापूर्वी पूर्ण शहानिशा करण्याचा सल्ला दिल्यामुळे गुप्ता यांनी आरोपी खंडारे आणि साथीदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
त्यांनी विसंगत उत्तरे दिल्यामुळे गुप्तांना संशय आला. त्यांनी नोकराच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला. इकडे खंडणीची रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पाहून खंडारे आणि त्याचे साथीदार चक्क भांडणावर आले. त्यामुळे गुप्ता आणि त्यांच्या कारखान्यातील माणसांनीही जशास तसे उत्तर देणे सुरू केले.
प्रकरण बिघडत असल्याचे पाहून खंडारेचे साथीदार पळू लागले. खंडारेला मात्र गुप्तांनी पकडून बेदम चोप दिला. तेवढ्यात पोलीसही पोहचले. त्यांनी खंडारेला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

वाहनावर प्रेसचे स्टीकर
आरोपी स्वत:ला मानवाधिकार आयोगाचे पदाधिकारी सांगत होते. मात्र, त्यांनी आपल्या वाहनावर ‘प्रेस‘ लिहिले होते. खंडारेने पोलिसांवर धाक जमविण्यासाठी स्वत: पत्रकार असल्याचे सांगितले. मात्र, तो आपले ओळखपत्र दाखवू शकला नाही.

Web Title: Ransom in the name of human rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.