‘रँकिंग’मध्ये नागपूर माघारले
By Admin | Updated: April 5, 2016 05:09 IST2016-04-05T05:09:44+5:302016-04-05T05:09:44+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक

‘रँकिंग’मध्ये नागपूर माघारले
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात नागपुरातील केवळ चार संस्थांचा समावेश आहे. ‘व्हीएनआयटी’ सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या २५ मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा (विश्वेश्वरैया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) देशात १८ वा क्रमांक आहे. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे.
देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रँकिंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रथमच प्रस्ताव मागविले होते.
देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये १८ वा क्रमांक आहे. देशातील काही ‘आयआयटी’लादेखील ‘व्हीएनआयटी’ने पछाडले आहे. अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज) व ‘वायसीसीई’ (यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज) क्रमांक अनुक्रमे ८३ व ९६ वा आहे. देशातील ‘टॉप’ व्यवस्थापन संस्थांमध्ये नागपूरातील ‘आयएमटी’ला (इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट टेक्नॉलॉजी) ३९ ‘रँकिंग’ मिळाले आहे.(प्रतिनिधी)
शहरातील संस्थांचे ‘रँकिंग’
अभियांत्रिकी
संस्था रँकिंग
व्हीएनआयटी१८
आरकेएनईसी८३
वायसीसीई ९६
व्यवस्थापन
संस्था रँकिंग
आयएमटी ३९