रणजी उपांत्य सामन्यात विदर्भाची अंतिम फेरीकडे कूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 09:28 PM2017-12-20T21:28:07+5:302017-12-20T22:04:57+5:30

वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्याच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचे सात गडी अवघ्या १११ धावांत बाद करीत रणजी करंडक उपांत्य सामन्यात विजयाकडे कूच केली आहे.

In Ranji trophy tournament semifinal Vidarbha go ahead | रणजी उपांत्य सामन्यात विदर्भाची अंतिम फेरीकडे कूच

रणजी उपांत्य सामन्यात विदर्भाची अंतिम फेरीकडे कूच

Next
ठळक मुद्देगुरबानीचा भेदक मारा; कर्नाटकवर विजयासाठी हवे तीन बळी

कोलकाता: वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्याच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचे सात गडी अवघ्या १११ धावांत बाद करीत रणजी करंडक उपांत्य सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. १९८ धावांचे विजयी लक्ष्य गाठणाऱ्या कर्नाटकला विदर्भाच्या गोलंदाजांनी कोंडीत पकडले असून आज गुरुवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी तीन गडी बाद करताच विदर्भ प्रथमच अंतिम फेरीत दाखल होऊ शकेल.
गणेश सतीश(८१) आणि आदित्य सरवटे(५५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर दुसऱ्या डावात विदर्भाने ३१३ पर्यंत मजल गाठली. अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा कर्नाटकला विजयासाठी ८७ धावांची तर विदर्भाला तीन गडी बाद करण्याची गरज होती.
कर्नाटकचे तळाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. कर्णधार आर. विनयकुमार(नाबाद १९) आणि श्रेयस गोपाल(नाबाद १) खेळत होते. या दोघांनी प्रथमश्रेणीत शतके ठोकली असली तरी सामन्यातील परिस्थिती विदर्भाच्या बाजूने आहे. उमेश यादव आणि गुरबानी यांचा वेगवान मारा खेळणे प्रतिस्पर्धी फलंदाजांना कठीण जात आहे. दुसºया डावात कर्नाटकची सुरुवात खराब झाली. या सत्रात हजारावर धावा काढणारा मयंक अग्रवालला उमेशने आपल्याच चेंडूवर झेलबाद केले. आर.समर्थ(२४) व देगा निश्चल(७) यांनी जवळपास १६ षटके खेळली पण धावांसाठी त्यांना झुंजावे लागले. युवा वेगवान गोलंदाज सिद्धेश नेरळ याने दोघांनाही लागोपाठ बाद करताच तीन बाद ३० अशी अवस्था होती.
पहिल्या डावात चांगली खेळी करणारा करुण नायर(३०)आणि सी.एस. गौतम(२४)यांनी जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न केला पण २४ वर्षांच्या गुरबानीने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. त्याने नायरला यष्टीमागे झेल देण्यास बाध्य केले तर स्टुअर्ट बिन्नीला भोपळाही न फोडू देताच परत पाठविले. सीएम गौतम आणि कृष्णप्पा गौतम यांना लागोपाठच्या षटकांत बाद करीत रजनीशने ३५ धावांत चार गडी बाद केले.
त्याआधी, विदर्भाने दुसऱ्या डावाची सुरुवात ४ बाद १९५ वरून केली. सतीश आणि अक्षय वाडकर(२८) यांनी पाचव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. मात्र मधली फळी कोसळताच विदर्भाने २४५ धावांत आठ गडी गमावले होते. सरवटेने एक टोक सांभाळून उमेश यादवसोबत(१२) नवव्या गड्यासाठी ३८ तसेच गुरबानी (नाबाद ७)याच्यासोबत अखेरच्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी केली. कर्नाटककडून विनयकुमार आणि बिन्नी यांनी प्रत्येकी तीन तसेच एस. अरविंदने दोन गडी बाद केले.

Web Title: In Ranji trophy tournament semifinal Vidarbha go ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.