रामटेकचे राम मंदिर खासगी मालमत्ता?
By Admin | Updated: October 15, 2016 03:02 IST2016-10-15T03:02:55+5:302016-10-15T03:02:55+5:30
रामटेक येथील राम व लक्ष्मण यांची मंदिरे खासगी मालमत्ता आहे असा दावा भोसले राजघराण्याने केला

रामटेकचे राम मंदिर खासगी मालमत्ता?
भोसले घराण्याचा दावा : हायकोर्टात सुनावणी सुरू
नागपूर : रामटेक येथील राम व लक्ष्मण यांची मंदिरे खासगी मालमत्ता आहे असा दावा भोसले राजघराण्याने केला आहे. या दाव्याला वैधता प्रदान करण्यासाठी राजे अजितसिंग भोसले व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रथम अपील दाखल केले आहे. या अपीलवर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी सुरू झाली आहे.
१९७०-७१ मध्ये दाते नामक अधिकाऱ्याने रामटेक येथील राम व लक्ष्मण यांची मंदिरे सार्वजनिक मालमत्ता असल्याचा अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारावर उपधर्मदाय आयुक्तांनी ३१ जुलै १९७१ रोजी ही दोन्ही मंदिरे सार्वजनिक मालमत्ता असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध सहधर्मदाय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले होते. सहधर्मदाय आयुक्तांनी हे प्रकरण पुनर्निर्णयासाठी उपधर्मदाय आयुक्तांकडे परत पाठविले. यानंतर उपधर्मदाय आयुक्तांनी १५ जुलै १९७७ रोजी दुसऱ्यांदा ही दोन्ही मंदिरे सार्वजनिक मालमत्ता असल्याचा निर्णय दिला. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने या निर्णयाविरुद्धचे अपील खारीज केले. यामुळे १९९३ मध्ये उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल करण्यात आले.
तेव्हापासून हे अपील प्रलंबित आहे. या अपीलवर शनिवारी किंवा सोमवारी निर्णय येण्याची शक्यता आहे. भोसले यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर व अॅड. हरनीश गढिया कामकाज पाहात आहेत.(प्रतिनिधी)