रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त?

By Admin | Updated: November 19, 2015 03:21 IST2015-11-19T03:21:13+5:302015-11-19T03:21:13+5:30

स्टील व्यवसायात नामांकित रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त असल्याची बाब आयकर धाडीत पुढे आली आहे.

Ramson group indulge in business? | रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त?

रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त?

निवास व कार्यालयाची तपासणी सुरू :
कोट्यवधींच्या संपत्तीची संशयास्पद कागदपत्रे ताब्यात

नागपूर : स्टील व्यवसायात नामांकित रॅमसन्स समूह हवाला व्यवसायात लिप्त असल्याची बाब आयकर धाडीत पुढे आली आहे. धाडीदरम्यान सापडलेली बेहिशेबी संपत्तीची संशयास्पद कागदपत्रे आणि डायरीवरून समूह देशविदेशात हवाला व्यवहारात कार्यरत असल्याच्या दिशेने अधिकारी तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या अधिकारी दोन ठिकाणी तपासणी करीत आहेत.
आयकर खात्याने रॅमसन्स ग्रुप आॅफ कंपनी आणि त्याच्या सहयोगी कंपन्या, फर्म व संचालकांची कार्यालये आणि निवासस्थानावर मंगळवारी सकाळी एकाचवेळी १२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. सध्या नीती-गौरव अपार्टमेंट, रामदासपेठ येथील कंपनीचे कार्यालय आणि रामस्वरुप सारडा व राजेश रामस्वरुप सारडा यांच्या १४, डागा ले-आऊट, उत्तर अंबाझरी मार्गावरील निवासस्थानाची तपासणी सुरू आहे.
जप्त केलेल्या हजारो कागदपत्रांमध्ये १०० पेक्षा जास्त कागदपत्रे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित आहेत. नागपूर, यवतमाळ आणि पुणे येथे निवासी योजना बनविण्याची समूहाची योजना आहे. रोखीत केलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार, बँक खात्यातील रकमेची तपासणी, लॉकर्समधील रोख व ज्वेलरीचे मूल्यांकन तसेच संचालक, वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीयांतील सदस्यांचे बयाण घेणे सुरू आहे. एकूण ८० अधिकाऱ्यांपैकी सध्या १५ अधिकारी तपासणी करीत आहेत. १० ठिकाणांवरून ६५ अधिकाऱ्यांना हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
रॅमसन्स समूह रामस्वरुप सारडा, लक्ष्मीनारायण सारडा, राजेश रामस्वरुप सारडा आणि सुरेंदरसिंग चहल यांचा आहे. समूहातर्फे रि-रोलिंग, टीएमटी स्टील बार, एमएस अ‍ॅन्गल, फ्लेक्स, अराऊंड, रॉड आदींचे उत्पादन करण्यात येते. या समूहाच्या एकूण पाच कंपन्या असून त्यापैकी राजाराम स्टील प्रा.लि. रॅमसन्स इस्पात प्रा.लि., रॅमसन्स रिफॅक्टरी प्रा.लि. या तीन कंपन्या एमआयडीसी, हिंगणा येथे तर रॅमसन्स टीएमटी प्रा.लि. आणि रॅमसन्स कास्टिंग प्रा.लि. या दोन कंपन्या बाजारगांव, अमरावती रोड येथे कार्यरत आहेत.
बोगस कंपन्या आणि हवाला मार्गाने काळा पैसा देशात आणणाऱ्या लोकांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. करचोरी, खोटी आयकर विवरण भरणारे, खोटी कागदपत्रे व बयाण देणाऱ्यांना आयकर कायद्यात सात वर्ष शिक्षेची तरतूद आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ramson group indulge in business?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.