राम जेठमलानी मांडणार माओवादी साईबाबाची बाजू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:45 IST2017-07-20T01:45:54+5:302017-07-20T01:45:54+5:30
देशातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी हे माओवादी चळवळीचा समर्थक व नक्षलींचा मास्टर माईन्ड....

राम जेठमलानी मांडणार माओवादी साईबाबाची बाजू?
हायकोर्ट : शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी अर्ज करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी हे माओवादी चळवळीचा समर्थक व नक्षलींचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा (४७) याच्यासाठी लढण्याची शक्यता आहे. साईबाबा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करणार आहे. साईबाबाच्या वतीने जेठमलानी यांनी युक्तिवाद करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने दहशतवादी कृत्याच्या प्रकरणात साईबाबा (४७) व इतर आरोपींना जन्मठेपेसह विविध वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. उच्च न्यायालयाने सर्वांचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे. अन्य आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (२२), पांडू पोरा नरोटे (२७), हेम केशवदत्ता मिश्रा (३२) ,प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांचा समावेश आहे. प्रा. साईबाबा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी व नरोटे मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही डेहराडून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. सर्व आरोपी दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून आले आहेत.
आतापर्यंत केवळ महेश तिरकी व प्रशांत राही यांनीच शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
येणाऱ्या काही दिवसांत साईबाबा व अन्य आरोपीही असा अर्ज दाखल करणार आहे. साईबाबासाठी राम जेठमलानी यांनी युक्तिवाद करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राहीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता नित्या रामाकृष्णन तर, तिरकीच्या वतीने नागपुरातील अॅड. सुरेंद्र गडलिंग कामकाज पहात आहेत.
जेठमलानी यांना कागदपत्रे दिलीत
साईबाबाच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी यांनी युक्तिवाद करावा अशी इच्छा आहे. त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. जेठमलानी यांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्यात आली आहेत. त्यांचा होकार मिळण्याची शक्यता आहे. ते प्रकरणाचा अभ्यास करीत आहेत.
- वसंता (साईबाबाची पत्नी).