राजू शेट्टी यांचा भट्टाचार्य यांच्याविरोधात हल्लाबोल

By Admin | Updated: March 21, 2017 01:43 IST2017-03-21T01:43:22+5:302017-03-21T01:43:22+5:30

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

Raju Shetty's attack against Bhattacharya | राजू शेट्टी यांचा भट्टाचार्य यांच्याविरोधात हल्लाबोल

राजू शेट्टी यांचा भट्टाचार्य यांच्याविरोधात हल्लाबोल

नागपुरात केले पुतळ्याचे दहन : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारणार
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करत नागपुरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, असे वक्तव्य भट्टाचार्य यांनी केले होते. याच्या निषेधार्थ राजू शेट्टी हे कार्यकर्त्यांसमोर सकाळी ९ च्या सुमारास स्टेट बँकेच्या रेल्वे स्थानकाजवळील मुख्य शाखेसमोर पोहोचले. सुरुवातीला भट्टाचार्य यांच्या विरोधात घोषणा लावण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित होते.
आम्ही सरकारमध्ये असलो तरी बाहेरून आंदोलने करून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. अनेक बँकांनी कॉर्पोरेट कंपन्यांसोबत डील केले आहे. उद्योजकांच्या कर्जाला माफी मिळते मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की त्यांचा अपमान करण्यात येतो. हे चालणार नाही. शेतकरी गप्प राहणार नाही. आम्ही कर्जमाफी मिळवूनच राहू व यासाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व शेट्टी यांचे समर्थक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Raju Shetty's attack against Bhattacharya