नागपुरातील कुख्यात राजू भद्रेसह सर्व आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:49 IST2018-01-25T21:44:13+5:302018-01-25T21:49:44+5:30
सत्र न्यायालयाने गुरुवारी क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणामध्ये सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे राजू विठ्ठल भद्रे याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.

नागपुरातील कुख्यात राजू भद्रेसह सर्व आरोपी निर्दोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणामध्ये सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे राजू विठ्ठल भद्रे याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. अन्य आरोपींमध्ये दिवाकर कोत्तुलवार, सुनील भाटिया, नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक तेवर, भरत दुबे व मंगेश शेंडे यांचा समावेश आहे.
१३ डिसेंबर २०१५ रोजी काही अज्ञात आरोपींनी राऊत यांचे अपहरण केले होते. दरम्यान, आरोपींनी राऊत यांना जबर मारहाण केली व डोक्याला बंदूक लावून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास राऊत व त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राऊत यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी २८ डिसेंबर २०१५ रोजी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३४२, ३६४(अ), ३६५, ३८४, ३८५, ३८६, ५०४, ५०६(ब) अंतर्गत एफआयआर नोंदविला. तसेच, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपींतर्फे अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अॅड. उदय डबले व अॅड. राजेश तिवारी यांनी बाजू मांडली.