‘इंद्रधनुष्य’मध्ये कलारंगांचा वर्षाव
By Admin | Updated: January 24, 2016 02:54 IST2016-01-24T02:54:21+5:302016-01-24T02:54:21+5:30
१३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये शनिवारी उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

‘इंद्रधनुष्य’मध्ये कलारंगांचा वर्षाव
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
नागपूर : १३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये शनिवारी उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. विविध स्पर्धांच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे आकर्षक सादरीकरण केले.
राज्यभरातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचा मंच प्रदान करणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. शनिवारपासून या महोत्सवातील स्पर्धांना खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. सकाळी ९ च्या सुमारास शास्त्रीय गायनाच्या स्वरांनी दीक्षांत सभागृहाने एक वेगळाच अनुभव घेतला. याचवेळी आमदार निवासामध्ये ‘आॅन द स्पॉट पेन्टिंग’ तसेच लेखी प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. तर वसंतराव देशपांडे सभागृहात एकांकिका सुरू होत्या. विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस अशा एकांकिकांचे सादरीकरण केले. उपस्थितांनी याला मनमोकळेपणाने दाद दिली.
दुपारच्या सुमारास दीक्षांत सभागृहात शास्त्रीय वादनाचे आयोजन झाले. शिवाय तालवाद्य सादरीकरणदेखील झाले. कागदापासून ‘कोलाज’ तयार करण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती अचंबित करणारी होती. काही विद्यार्थ्यांनी तर अप्रतिम ‘कोलाज’ तयार केले व परीक्षकांनादेखील कोड्यात टाकले.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये दिसली शिस्त
राज्यातील विविध विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले असूनदेखील ‘इंद्रधनुष्य’मध्ये शिस्तीचे वातावरण दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनीच यात पुढाकार घेतला आहे. एखाद्या गोष्टीत संभ्रम निर्माण झाला तरी विद्यार्थी शांत राहून विचारणा करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दिवशी जरी काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी आता विद्यार्थ्यांची कुठलीही तक्रार नाही. विद्यापीठाचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेकडे आता जातीने लक्ष देत आहेत.